
जळगाव : प्रतिनिधी
शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळील मुख्यरस्त्यावर रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने मागून येणाऱ्या तरुणाचे दुचाकीवरचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून तरुण जखमी झाला आहे. या तरुणाच्या डोक्याला व शरीराला जबर दुखापत होऊन त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त असे की , शहरातील रिधुर वाड्यातील रहिवासी असलेला तरुण राहुल गवरलाल पाटील (वय २७) हा इच्छादेवी चौकाकडे जात असताना पंचमुखी हनुमान मंदिराजवळ पुढे जात असलेल्या रिक्षा चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने त्याचे दुचाकीवरून नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकीस्वार राहुल पाटील याचा तोल जाऊन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला तर शरीराला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली. नागरिकांनी त्याला तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणी दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले.





















