जळगाव मिरर | ७ डिसेंबर २०२४
यावल तालुक्यातील दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात एका तरुणाने कारण नसताना येवून कार्यालयातील साहित्याची नासधूस केली व कर्मचाऱ्यांसह सरपंच, उपसरपंचांना शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी यावल पोलिसांत तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटनासमोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथील हर्षल उर्फ कालू विश्वास पाटील हा तरूण ५ डिसेंबरला सकाळी ११ वाजेच्या सुमारास दहिगाव ग्रामपंचायत कार्यालयात आला. त्यानंतर ग्रामपंचायत कर्मचारी रवींद्र शिवाजी पाटील यांना खुर्चीवरून ताणून तरुणाने मारहाण केली. तर सरपंच, उपसरपंच कोठे गेले? त्यांना व्यवस्थित काम करता येत नाही का? असे म्हणून शिविगाळ करून मारहाण केली.
तसेच ग्रामपंचायत कार्यालयातील नऊ नंबरचे रजिस्टर आणि टेबल, खुर्चीची मोडतोड केली. तसेच सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पुंडलिक राजाराम पाटील, पाणीपुरवठा कर्मचारी सुधाकर गोविंदा पाटील, विजय शालिग्राम पाटील, कर्मचारी रवींद्र पाटील यांना अश्लील शिवीगाळ केली. तसेच आत्महत्या करून तुमचे नावे टाकून तुम्हाला फसवेल, अशी धमकी दिली. याच स्वरुपाची फिर्याद रवींद्र शिवाजी पाटील यांनी दिल्यावरून यावल पोलिसात विविध कलमान्वये हर्षल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, या तरुणाने गावात खुलेआम हातभट्टीची गावठी दारू विक्री बंद करावी, या मागणीकरिता ग्रामपंचायत कार्यालयात गाठले व त्या ठिकाणी हा प्रकार केल्याची गावात सर्वत्र चर्चा होत आहे.