जळगाव मिरर | 25 ऑगस्ट 2026
अमळनेर बोरी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कन्हेरे येथे २४ रोजी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. दक्ष राजेंद्र नेरकर (वय १२ वर्षे) हा शाळा सुटल्यानंतर बोरी नदीपात्रात पोहायला गेला होता.

दरम्यान, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दक्षला नदीपात्रातून बाहेर काढण्यात आले. तर, लगेच त्याला तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.




















