जळगाव मिरर | १२ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतांना आता मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पनवेलजवळ क्रूझरचा भीषण अपघाताची घटना घडली आहे. या अपघातात अवघ्या २२ वर्षांच्या इन्फ्लूएन्सरला आपला जीव गमवावा लागला आहे. असफिया बानो मोहम्मद फरीद खान असं या अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. तर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. हा अपघात पनवेलजवळ झाला आहे.
सविस्तर वृत्त असे कि, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथील असफिया खान ही रहिवाशी आहे. ती मित्रांसोबत फिरण्यासाठी मुंबईला आली होती. त्यांची गाडी लोणावळ्याला निघाली होती, त्यावेळी पलस्पे फाट्याजवळ गाडी काँक्रीट ब्लॉकला धडकून पलटी झाली. या अपघातातील जखमींना कपूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघातात अवघ्या २२ वर्षांच्या असफिया हिला आपला जीव गमावावा लागला आहे. ती सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर होती. तिचे सोशल मीडियावर दहा लाखांहून अधिक फॉलोअर्स होते. ती मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी होती. १५ दिवसांपूर्वी ती आपल्या मित्रांसह टोयोटा क्रूझर गाडीतून मुंबईत आली होती.
रविवारी मध्यरात्री ती आणि तिचे मित्र मुंबईहून लोणावळ्याच्या दिशेने निघाले होते. त्यावेळी काळाने गाठलं आणि भीषण अपघाताची घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा अपघातात चक्काचूर झाला आहे. चालकांचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे. या अपघातात मोहम्मद अरबाज मोहम्मद अहमद (वय २४), मोहम्मद अरिफ मोहम्मद आझम (वय २४) आणि रिझवान खान (वय २६) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.
या भीषण अपघाताची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, असफियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. डॅाक्टरांनी तिला मृत घोषित केले. या प्रकरणी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एअरबॅग्जमुळे इतर चार जणांचा जीव वाचला, मात्र असफिया हि मागच्या सीटवर असल्याने तिच्या डोक्याला गंभीर इजा झाल्याने तिला आपला जीव गमावावा लागला आहे.




















