
जळगाव मिरर | १ जुलै २०२६

दुष्काळजन्य परिस्थीतीत वरदान ठरत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील कन्हेरे येथील ब्रिज कम बंधाऱ्याचा पॅटर्न आता राज्यभरात राबविला जाणार असून जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्लूडी) अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे यांच्या संकल्पनेतून झालेल्या या बंधाऱ्यांच्या सादरीकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर शिक्कामोर्तब केला आहे. या पुढे राज्यात ‘ब्रीज कम बंधाऱ्याचा जळगाव पॅटर्न’ ची अंमलबजावणी राज्यात होणार आहे.
अल-निनो मुळे राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थिती व त्याबाबत उपाययोजना याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली दि.३० जून रोजी विधानमंडळ मंत्रिमंडळ बैठककक्षात बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदामंत्री ना. गिरीश महाजन, जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील तसेच वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता मदत व पुनर्वसन प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद-सिंघल, जलसंपदा विभागाचे प्रधानसचिव एकनाथ डवले, नियोजन विभागाच्या सचिव श्रीमती शैला ए मृदसंधारण अधिकारी जितंद्र पापळकन आदी उपस्थित होते.
ब्रिज कम बंधारा जळगाव जिल्ह्यात यापूर्वी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून प्राप्त निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने पूर्ण केले आहेत. कन्हेरे ता. अमळनेर येथे बोरी नदीवरील बंधारा या कामाचे सादरीकरण व फोटो मुख्यमंत्री फडणवीस व मंत्री गिरीश महाजन यांचे कडून देण्यात आला. या बैठकीत मुख्यमंत्री यांनी ब्रिज कम बंधारा बांधणे बाबत निर्देश दिले. अमळनेर विधानसभा मतदार संघाचे आ. अनिल भाईदास पाटील यांच्याकडे याबाबत त्या काळात ब्रिज कम बंधाऱ्याबाबत चर्चा झाली. जवळपास २५ बंधारे तत्कालीन कार्यकारी अभियंता प्रांजल पाटील यांनी प्रस्तावित केले होते. सुरुवातीला भिलाली येथील बंधारा यशस्वी झाल्यानंतर कन्हेरे बंधारा हाती घेण्यात आला होता, आता या बंधाऱ्यांचे पॅटर्न राबविले जाणार असून मंत्री गिरीश महाजन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादरीकरण केले.
जळगाव पीडब्लूडीचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अमळनेर तालुक्यात पाडळसे धरण वगळता जलस्त्रोत नसल्याने दुष्काळस्थितीवर मात करण्यासाठी रस्त्यावरील पुल व मोऱ्यांच्या लगत कमी उंचीचे आर्च बंधारे कन्हेरे येथे बांधले आहे. साधारणतः दिड कोटी ते ६ कोटी पर्यंत या बंधाऱ्यांचा खर्च आहे. बोरी व नांदगाव पुल येथे देखील असे बंधारे प्रस्तावित करण्यात आले आहे.




















