धरणगाव : प्रतिनिधी
येथील पी. आर. हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा खान्देशातील सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा.बी. एन. चौधरी यांना औदुंबर साहित्य रसिक मंडळाने आयोजित केलेल्या, राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात, ‘अक्षर सन्मान पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष उत्तमराव कांबळे तसेच उद्घाटक अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रा. चौधरी यांना स्मृतीचिन्ह, गौरवपत्र, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. सर्जेराव जिगे, डॉ. केशव देशमुख, माजी आमदार महेंद्रसिंह पाटील, अमित पाटील, अध्यक्ष ॲड.मोहन शुक्ला, प्रा.वा. ना. आंधळे, विलास मोरे, अरुण माळी आदी उपस्थित होते. प्रा. चौधरी यांच्या वाड्मयीन कर्तृत्वाचा मला सदैव सार्थ अभिमान वाटतो असे डॉ. श्रीपाल सबनीस या प्रसंगी म्हणाले.
प्रा. चौधरी हे सारस्वतांच्या मांदियाळीतील प्रतिभासंपन्न वारकरी म्हणून पंचक्रोशीत ज्ञात आहेत. समाज प्रबोधनाची कास धरत, त्यांच्या लेखणीने खान्देशसह महाराष्ट्रात मनामनावर आपली पकड दृढ केलीय, याचा आम्हाला आनंद आणि सार्थ अभिमान वाटतो, असे प्रतिपादन मंडळाचे अध्यक्ष ॲड.मोहन शुक्ला यांनी गौरवपत्र देतांना केले.
औदुंबर मंडळाने दिलेला हा सन्मान आपल्या साहित्यिक वाटचालीची, पोच पावती असून, आपण भविष्यात ती अधिकाधिक दृढ करण्याचा प्रयत्न करु, असे मनोगत प्रा.बी.एन.चौधरी यांनी आभार व्यक्त करतांना केले. कार्यक्रमाला पी.आर.हायस्कूल सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अरुण कुलकर्णी, सचिव डॉ. मिलिंद डहाळे, संचालक अजयशेठ पगारिया, मुख्याध्यापक डॉ. संजीवकुमार सोनवणे, संपादक दिलिप तिवारी, डॉ. मिलिंद बागुल, वि. दा. पिंगळे, गणेश सुर्यवंशी, निरज शिंदे, प्रविण महाजन, भिमराव सोनवणे यांसह परीसरातील साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन वैशाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रविण महाजन यांनी केले.
