
जळगाव मिरर | २० मे २०२३

रावेर तालुक्यातील सावखेडा गावातील एका तरुणाने जळगावातील एका तरुणीशी प्रेमविवाह केल्यानंतर तरुणीच्या संतप्त झालेल्या मंडळींनी गाड्या भरून आणत तरुणाच्या घरावर हल्ला चढवला. नववधूच्या पतीसह त्याच्या कुटूंबियांना जबर मारहाण करीत नववधूचे अपहरण केल्यानंतर विवाहितेला चारचाकी वाहनातून नेल्याची धक्कादायक घटना शुक्रवार, 19 रोजी दुपारी दिड वाजता घडली. या प्रकरणी सावदा पोलिसात पाच मुख्य आरोपींसह अन्य 40 जणांच्या जमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील सावखेडा बु. येथील प्रफुल्ल रमेश पाटील या तरुणाने जळगावातील तरुणीसोबत प्रेमविवाह केल्याने दोघांनी बर्हाणपूर स्थानिक न्यायालयात नोटरी पद्धतीने प्रेम विवाह केला. त्यानंतर बर्हाणपूरच्या गायत्री संस्कार ट्रस्टमध्ये नोंदणी पद्धतीने विवाह केला. आपल्या मुलीने परस्पर प्रेम विवाह केल्याचा राग मनात ठेवून तिच्या माहेरकडील पाच नातेवाईकांसह इतर 30 ते 40 तरुणांनी शुक्रवार, 19 मे च्या दुपारी दिड वाजेच्या सुमारास तिचे सावखेडा बुद्रुक, ता.रावेर येथील सासर गाठले. चारचाकी आणि दुचाकीने आलेल्या संशयितांनी सुरूवातीला लोखंडी रॉडद्वारे घरातील साहित्याची तोडफोड केली. तक्रारदाराचा भाऊ प्रज्वल याने विरोध केल्याने त्याच्या तोंडावर व डाव्या हाताच्या पंजावर मारून दुखापत करण्यात आली तसेच तक्रारदारासह त्याच्या आजीला लोखंडी रॉड मारण्यात आला तसेच या प्रकारात तक्रारदाराच्या आईच्या गळ्यातील सोन्याची पोत तुटली व आरोपींनी पत्नीचे घरातून अपहरण करीत बळजबरीने पांढर्या वाहनातून जळगावकडे पलायन केले.




















