
जळगाव मिरर | १३ जून २०२३
जगभरात नुकतेच बिपरजॉय चक्रीवादळाने हाहाकार माजविला असतांना आता राज्यात देखील चक्रीवादळाच्या प्रभावामुळे कोकणकिनारपट्टीवर अचानक लाटांचा तडाखा बसत आहे. गणपतीपुळे येथे रविवारी सायंकाळी याचा प्रत्यय आला. यामध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. या लाटेमुळे ४९ व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे.
पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी गणपतीपुळे किनाऱ्यावर पर्यटकांना जाण्यास प्रशासनाकडून बंदी घालण्यात आली असून, जीवरक्षक तैनात केले आहेत. जिल्ह्यातील अन्य किनाऱ्यांवरही पर्यटकांनी जाऊ नये, असे प्रशासनाने आवाहन केले आहे. चक्रीवादळामुळे समुद्र खवळलेला असून, १६ जूनपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. अचानक उंच लाटा किनाऱ्यांवर धडकत आहेत. सोमवारीही अशीच परिस्थिती गणपतीपुळेसह रत्नागिरीतील भाट्ये, आरेवारे, नेवरे किनाऱ्यांवर आहे. त्यामुळे पर्यटकांनी पाण्यात उतरू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. गणपतीपुळे येथे पोलिसही लक्ष ठेवून आहेत. तिथे बोर्डही लावण्यात आला असून, जीवरक्षकांची करडी नजर आहे. पर्यटकांना किनाऱ्यावर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. काल सकाळी किनाऱ्यावर दोरी बांधून ठेवण्यात आली आहे. रविवारी सायंकाळी गणपतीपुळे किनारी अचानक आलेल्या मोठ्या लाटेनंतर प्रशासन सतर्क झाले आहे. या लाटेमध्ये काही पर्यटक जखमीही झालेत. याचा सर्वाधिक फटका किनाऱ्यावरील नारळ व्यावसायिक, फेरीवाले यांना बसला.
साहित्य वाहून गेल्यामुळे ४९ व्यावसायिकांचे सुमारे साडेतीन लाखांचे नुकसान झाले आहे. त्यातील दिनेश नावाच्या एका व्यावसायिकाची २७ हजार रुपयांची रोख रक्कम आणि अन्य साहित्य वाहून गेले. आठ जणांचे दहा हजारांपेक्षा अधिक नुकसान झाले. पालकमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (ता. १२) परिस्थितीची पाहणी करून व्यापाऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. यामध्ये पाच हजार चारशे रुपये सरसकट भरपाई दिली जाणार आहे.





















