
जळगाव मिरर | ३० जून २०२४
आमची आघाडी हाच आमचा मुख्यमंत्रीपदाचा सामुदायिक चेहरा आहे. सामूहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र आहे, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून महाविकास आघाडीत सुरू असलेल्या वादावर तूर्त तरी पडदा पडला आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत मोदींनी १८ मतदारसंघांत सभा घेतल्या; परंतु त्यांचे १४ उमेदवार पराभूत झाल्याचेही पवार म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये काही दिवसांपासून मुख्यमंत्रीपदावरून चर्चा सुरू आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, या खासदार संजय राऊत यांच्या विधानामुळे जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यावर शरद पवार म्हणाले की, महाविकास आघाडी हाच सध्या तरी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे. आम्ही सामुदायिकरीत्या निवडणुकीला सामोरे जात असल्याने सामूहिक नेतृत्व हेच आमचे सूत्र राहणार आहे. पवार यांच्या या वक्तव्याने मविआत मुख्यमंत्रीपदाच्या नावावरून सुरू असलेली चर्चा थांबणार आहे






















