
जळगाव मिरर | १३ सप्टेबर २०२४
अहमदाबाद येथे जाण्यासाठी बसमध्ये चढतांना ८१ वर्षीय वृद्ध महिला चाकाखाली आली. त्यामुळे बसचे चाक पायावरुन गेल्याने कमलबाई रामराव अंडाईत (वय ८१ रा. अहमदाबाद गुजरात) या गंभीर जखमी झाल्याची घटना किनगाव बस स्थानकावर घडली होती. या महिलेला उपचारार्थ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी उपचार सुरु असतांना वृद्धेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिवहन मंडळाचे पथक व यावल पोलिसांचे पथक लागलीच किनगावला दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील किनगाव येथील बस स्थानकावर रावेर एसटी आगाराची बऱ्हाणपूर ते सुरत ही बस क्रमांक (एम. एच. २० – बी. एल. ३३९७) घेऊन चालक – खेमचंद तेली हे यावल कडून चोपड्याला जात होते. दरम्यान – बस स्थानकावर बस लावत असतांना बस मध्ये बसण्याकरीता प्रवाशांनी प्रचंड गर्दी केली. याचवेळी गर्दीमध्ये मागच्या चाकात कमलबाई अंडाईत या अडकल्या. त्यांच्या दोघ पायावरून बसचे मागील चाक गेल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. बाजार समितीचे उपसभापती बबलू कोळी, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रशांत पाटील, रवींद्र ठाकूर, काँग्रेसचे बशीर तडवी, उबाठाचे उपजिल्हा प्रमुख गोपाल चौधरी, पिना कोळी सह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तातडीने महिलेला उपचाराकरिता जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात दाखल केले.
शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु असतासंना कमलबाई अंडाईत या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. तर अपघाताची माहिती मिळताच यावल पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी उमेश महाजन हे दाखल झाले घटनास्थळी पंचनामा करून वाहन यावल एसटी आगारात लावण्यात आले आहे. या घटनेमुळे किनगाव बस स्थानकावर प्रचंड गदी झाली होती.





















