
जळगाव मिरर | २५ एप्रिल २०२५
तालुक्यातील शिरसोली येथील सज्जनशाह बाबा यांच्या दर्यावर घरातील लग्नकार्य आटोपल्यानंतर पाहुणे मंडळींसोबत कुटुंबिय गेले होते. त्या परिसरात काही मुली खेळत असतांना तीन जणांचा पाय घसरुन त्या नायगाव धरणाच्या पाण्यात बुडाल्या. नातेवाईकांनी पाण्यात उडी घेत दोन मुलींना वाचवले. मात्र खुशी अरमान पटेल (वय १४, रा. फातेमा नगर) हीचा बुडून दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना गुरुवार दि. २४ रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फातेमा नगरात अरमान पटेल हे वास्तव्यास असून दि. १८ रोजी त्यांच्या मोठ्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला. लग्नसोहळ्याकरीता पटेल कुटुंबियांकडे नातेवाईक आले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर घरी आलेल्या नातेवाईकांसोबत पटेल कुटुंबीय हे शिरसोलीजवह नायगाव धरणाजवळ असलेल्या सज्जनशाह बाबा यांच्या दर्यावर गेले होते. धरणाच्या परिसरात अरमान पटेल यांची लहान मुलगी खुशी ही आपल्या मैत्रीणींसह खेळत होती. याठिकाणी त्यांचे नातेवाईक देखील उपस्थित होते. धरणाजवळ खेळणाऱ्या तीन मुलींचा अचानक पाय घसरला आणि त्या धरणाच्या पाण्यात बुडू लागल्या.
धरणाच्या खोल पाण्यात तिघ मुली बुडत असतांना त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी तेथे असलेल्या मुजाहीद पटेल या युवकाने धरणाच्या पाण्यात उडी घेत बुडत असलेल्या आयशा पटेल (वय १२), अलिझा पठाण (वय १३) या दोघांनी पाण्यातून बाहेर काढले. परंतू तो पर्यंत खुशी ही खोल पाण्यात बुडाल्याने तीचा दुर्देवी मृत्यू झाला. काही वेळानंतर बुडालेल्या खुशी पटेल हीला पाण्यातून बाहेर काढून तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून खुशी हीला मयत घोषीत केले. यावेळी रुग्णालयात तिच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला. अरमान पटेल यांच्या मुलीचे सहा दिवसांपुर्वीच विवाह सोहळ्याकरीता नातेवाईक आल्यामळे त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण होते. मात्र गुरुवारी दुर्देवी काळाने त्यांच्या लहान मुलीवर झडप घातल्याने काही क्षणातच आनंदीत असलेल्या पटेल कुटुंबियांवर दुःखा डोंगर कोसळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.




















