
जळगाव मिरर | संदीप महाले

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या बदलीच्या प्रकरणाची सध्या विभागात मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. संबंधित अधिकाऱ्याची सुमारे आठ महिन्यांपूर्वी राज्यातील एका जिल्हा परिषदेत बदली झाल्याचे सांगितले जाते. मात्र, अद्याप त्यांनी नव्या ठिकाणी पदभार स्वीकारलेला नसल्याची माहिती समोर येत असल्याने या प्रकरणाबाबत विविध तर्क-वितर्क व्यक्त केले जात आहेत.
दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याची नाशिक येथे बदली व्हावी यासाठी वरिष्ठ स्तरावर हालचाली सुरू असल्याची चर्चा विभागात दबक्या आवाजात सुरू आहे. काही स्तरावर आर्थिक व्यवहार झाल्याच्याही चर्चा केल्या जात आहेत. मात्र, या दाव्यांना कोणताही अधिकृत पुरावा उपलब्ध झालेला नाही आणि संबंधित दाव्यांची स्वतंत्रपणे पुष्टी होऊ शकलेली नाही.
या प्रकरणामुळे सार्वजनिक बांधकाम विभागातील बदली प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बदली आदेशानंतरही दीर्घकाळ पदभार स्वीकारला गेला नसल्याने प्रशासकीय नियमांबाबतही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्याला कोणाचा राजकीय किंवा प्रशासकीय पाठिंबा आहे का, याबाबतही विभागात विविध चर्चा रंगत आहेत. तथापि, यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती किंवा दस्तऐवजी पुरावा अद्याप समोर आलेला नाही.
या संपूर्ण प्रकरणाबाबत संबंधित अधिकारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, त्यांची प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर तीही प्रसिद्ध करण्यात येईल. (भाग – २)




















