
जळगाव मिरर | २६ जून २०२६

शेतकऱ्यांना आणि फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना (FPCs) त्यांच्या शेतीमालाला योग्य व हमीभाव मिळावा, तसेच बाजारातील दरांचे चढ-उतार समजून घेऊन थेट कॉर्पोरेट बाजारपेठेशी कसे जोडावे, या उद्देशाने जळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती (APMC) येथे एका विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आणि संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
हा कार्यक्रम ‘कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्था’ यांच्या सौजन्याने आणि ‘एनसीडीएक्स’ यांच्या मार्गदर्शनाने यशस्वीरित्या संपन्न झाला.
तांत्रिक मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन
या कार्यक्रमात मुंबईहून आलेल्या ‘एनसीडीएक्स’च्या वरिष्ठ अधिकारी टीमने उपस्थित शेतकरी आणि FPC प्रतिनिधींना बाजारपेठेतील तांत्रिक बाबी समजावून सांगितल्या. यामध्ये प्रामुख्याने: मार्केटमधील दरांचे चढ-उतार: बाजारात शेतीमालाचे भाव कमी-जास्त का आणि कसे होतात, यामागील गणिते स्पष्ट करण्यात आली. ऑनलाईन खरेदी-विक्री (Trading): पारदर्शक पद्धतीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करून थेट विक्री कशी करावी , याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. जोखीम व्यवस्थापन (Hedging): भविष्यात होणाऱ्या दरातील नुकसानीपासून शेतकरी उत्पादक कंपन्या स्वतःचा बचाव कसा करू शकतात, यावर मौल्यवान मार्गदर्शन करण्यात आले.
फील्ड व्हिजिटचे (क्षेत्र भेट) नियोजन
बैठकीनंतर ‘एनसीडीएक्स’च्या टीमला स्थानिक पातळीवरील प्रत्यक्ष कामकाजाची माहिती मिळावी, यासाठी काही यशस्वी फार्मर प्रोड्युसर कंपन्यांच्या (FPCs) क्षेत्र भेटीचे (Field Visit) आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान अधिकाऱ्यांनी थेट फिल्डवर जाऊन FPC च्या साठवणूक व्यवस्था आणि व्यवस्थापनाची पाहणी केली.
प्रमुख उपस्थिती – या प्रसंगी कृषी विकास संस्थेचे अमित नाफडे, एनसीडीएक्स मुंबई टीमचे मुख्य अधिकारी रोहन धांडे आणि धान्य कमिटी सचिव शिंदे साहेब प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी उपस्थित शेतकरी व FPC संचालकांना योग्य दिशा दाखवत मार्गदर्शन केले. या संपूर्ण महत्त्वपूर्ण कार्यक्रमाचे सर्वोच्च नियोजन, स्वागत आणि समन्वय कृषी विकास ग्रामीण प्रशिक्षण संस्थेचे फिल्ड कॉर्डिनेटर धिरज संतोष अंबिकर यांनी स्वतः यशस्वीरित्या सांभाळले.
कार्यक्रमाचे फलित
या उपक्रमामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट राष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठेशी जोडण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. कृषी विकास संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या या चोख नियोजनाचे ‘एनसीडीएक्स’ आणि ‘APMC’ च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष कौतुक करण्यात आले. कार्यक्रमाला परिसरातील प्रगतशील शेतकरी आणि विविध FPC चे संचालक व प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















