जळगाव मिरर | २४ मे २०२५
राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून हाणामारी व खुनाच्या घटना घडत असतांना आता एक खळबळजनक घटना अमरावती जिल्ह्यातून समोर आली आहे. एक चोवीस वर्षीय तरुण शेतीच्या कामासाठी मध्यप्रदेशातून थेट मोर्शी तालुक्यातील पाळा शिवारात येवून राहत होता. दरम्यान, त्या तरुणाचे शुक्रवारी (दि. २३) लग्न होते. मात्र, लग्नाच्या दोन दिवसांपूर्वीच नवरा मुलगा बेपत्ता झाला होता. दरम्यान, लग्नाच्या दिवशीच म्हणजे शुक्रवारी सकाळी या तरुणाचा मृतदेह शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील एका शेतातील विहिरीत सापडला. तरुणाचा खून त्याच्या भावी पत्नीच्या प्रियकरानेच केला असल्याचे समोर आले. त्यामुळे शिरखेड पोलिसांनी अवघ्या काही तासांत मारेकऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेने जो तरुण बोहल्यावर चढणार होता, त्याचाच मृतदेह सरणावर ठेवावा लागला. धरमू मलियन उईके (२४, रा. पाळा ह. मु. पाठनाका, आठनेर, बैतूल) असे मृत तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांनी दयाराम वरठी (३२, रा. वलनी, मध्यप्रदेश) याला अटक केली आहे. धरमूचे चार महिन्यांपूर्वी एका तरुणीसोबत रितीरिवाजाप्रमाणे लग्न ठरले होते. दोन्ही कुटुंबांनी हा विवाहसोहळा २३ मे रोजी करण्याचे ठरवले होते. दरम्यान, धरमू हा कामानिमित्त मोर्शी तालुक्यातील पाळा येथे राहत होता. दरम्यान, २१ मे रोजी तो अचानक बेपत्ता झाला. त्यामुळे धरमूचे वडील मलीयान उईके यांनी मुलगा बेपत्ता झाल्याबाबत मोर्शी पोलिसांत तक्रार दिली होती. त्याचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी सकाळी शिरखेड ठाण्याच्या हद्दीतील कवठळ शिवारात एका शेतातील विहिरीत मृतदेह शेतकऱ्यांना दिसला. त्यांनी तत्काळ ही माहिती शिरखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांना माहिती मिळाली की, दोन दिवसांपूर्वी सदर तरुण बेपत्ता असल्याची नोंद मोर्शी पोलिसांत आहे. त्यामुळे त्याचे नाव धरमू उईके असल्याचे समोर आले. त्या आधारावर पोलिसांनी तपास सुरू केला. कारण सदर मृत तरुणाच्या डोक्यावर दगडाने ठेचल्याचा मार होता. त्यावरून हा खून असून आरोपीने पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह विहिरीत टाकल्याचे समोर आले.
त्यानंतर शिरखेड पोलिसांना माहिती मिळाली की, धरमूचे आज लग्न होणार होते. दरम्यान, धरमू शेवटचे दयारामसोबत पाळा शिवारात असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्यामुळे दयारामचा शोध घेण्यात आला. दयारामला पोलिसांनी लगेच ताब्यात घेतले, तेव्हा खुनाचा उलगडा झाला. दयारामच्या प्रेमिकेचे धरमूसोबत लग्न होणार होते. ते दयारामला मान्य नव्हते. त्यामुळेच दयारामने धरमूचा कायमचा काटा काढल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. हा उलगडा एसडीपीओ संतोष खांडेकर, शिरखेडचे ठाणेदार सचिन लुले, एपीआय लक्ष्मण ढेंगळे, वैभव घोगरे, पंकज चौधरी, रोषण कथे, लहाने यांनी काही तासांतच केला. धरमूचे लग्न चार महिन्यांपूर्वी जुळले होते. दरम्यान, एक महिन्यांपूर्वी समाजाच्या मेळाव्यात धरमू आणि दयाराम यांच्यात ओळख झाली होती. त्यावेळी या दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली होती. त्यांच्यात थोडीबहूत मैत्रीही होती. त्यामुळेच २१ मे रोजी धरमू हा दयारामसोबत गेला. त्यानंतर दयारामने दारू पाजून धरमूचा काटा काढला आहे.
