
जळगाव मिरर | २७ मे २०२५
अमळनेर तालुक्यातील बोदर्डे गावातील झोपडीला अचानक भीषण आग लागल्याची घटना दि २६ रोजी रात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास घडली. यात झोपडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. त्यामुळे संसार उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेत काशिनाथ दीलभर भील यांची झोपडी संपूर्णपणे जळून खाक झाली.
सविस्तर वृत्त असे कि, या आगीत त्यांच्या संसारोपयोगी वस्तू, धान्य, कपडे, पैसे, दूरदर्शन संच, तसेच महत्त्वाची कागदपत्रेही जळून गेले. संपूर्ण संसार उध्वस्त झाल्याने कुटुंब उपासमारीच्या संकटात सापडले आहे. काशिनाथ भील हे अत्यंत गरीब परिस्थितीत कष्ट करून आपला उदरनिर्वाह करत होते. मात्र या आगीने त्यांच्यावर काळाचा घाला घातला असून सध्या त्यांच्याकडे निवाऱ्यासाठीही काहीच उरलेले नाही. संबंधित प्रशासनाने या दुर्घटनेची तातडीने दखल घेऊन आर्थिक मदत व आवश्यक जीवनावश्यक वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. स्थानिकांनीही मदतीसाठी पुढे यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.




















