
जळगाव मिरर | १४ जून २०२५
भुसावळ येथील पालिकेच्या बालवाडी परिसरात बसण्याच्या कारणावरून उद्भवलेल्या वादातून शहरातील आगाखान वाडा, शिवाजी नगर येथे एका युवकाला मारहाण करण्यात आली. यानंतर हल्लेखोरांनी पीडिताच्या घरात घुसून कुटुंबीयांनाही बेदम मारहाण करत तोडफोड केली. या प्रकरणी ६ जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलाम मोहम्मद शेख बिस्मिल्ला (वय २७) यांनी याप्रकरणी दिलेल्या तक्रारीनुसार ११ जून रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास ते आपल्या घराजवळील पालिकेच्या बालवाडीसमोर बसले होते. त्याचवेळी अहमद इब्राहीम कुरेशी, सुलताना बी अहमद कुरेशी आणि साहील मुशीर शेख हे तेथे आले आणि येथे का बसले, तुमच्या बापाची ही बालवाडी नाही, असे म्हणत वाद घातला. त्याला उत्तर दिल्यावर तिघांनी शिवीगाळ करत त्यांनी त्यांना मारहाण केली.
त्यानंतर पीडित घरी निघून गेले. मात्र, रात्री १०.१५ वाजता संबंधित आरोपी व त्यांच्यासोबत आलेल्या इतर तिघांनी गुड्डी शेख मुशीर, नसिम शेख सलीम आणि शमा बी हफीज यांनी पीडिताच्या घरी घुसून काका गुलाम दस्तगीर शेख रोशन यांच्यावर लोखंडी सळईने हल्ला केला. शिवाय, ‘तेरा भतीजा जहां मिलेगा उसे मार डालेंगे, अशी धमकीही दिली. या हल्ल्यात गंभीर दुखापत झाल्याने संबंधितांना ट्रामा केअर येथे उपचारासाठी दाखल केले आहे. या प्रकरणी १३ जूनला पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक तडवी या घटनेचा तपास करत आहेत.



















