
जळगाव मिरर | १५ जून २०२५
राज्यातील अनेक शहरातील पर्यटक उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये पर्यटनाला जात असतात, याच दरम्यान नागपूर शहरातील एका परिवार देखील मनालीमध्ये पर्यटनासाठी गेले होते. याच दरम्यान त्या परिवाराचा मनालीमध्ये भीषण अपघात ओढवला आहे. झिप-लाइन खेळताना बेल्ट तुटल्याने एक तरुणी 30 फूट उंचीवरून खाली पडली, यात तिच्या पायाला अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. त्रिशा बिजवे असे तरुणीचे नाव आहे. या घटनेमुळे पर्यटनस्थळांवरील साहसी खेळांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्रिशाच्या कुटुंबीयांनी या घटनेचा व्हिडिओ शेअर करत अपुऱ्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
पर्यटन आणि तेथील सुरक्षा हा विषय ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अनेकदा पर्यटनस्थळी साहसी खेळ खेळतानाही प्रवाशांच्या जीवावर बेतले जाते. अनेकदा पुरेशी सुरक्षा नसतानाही पर्यटकांकडून अतिउत्साहाच्या भरात जीवघेणा टास्क केला जातो. पर्यटनस्थळी साहसी खेळांमध्ये पुरेशी सुरक्षा नसल्यास कायबेतू शकते, हे त्रिशासोबत घडलेल्या घटनेवरून दिसून आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील रहिवासी प्रफुल्ल बिजवे आपल्या पत्नी आणि मुलगी त्रिशासोबत उन्हाळी सुट्टीनिमित्त मनालीला गेले होते. रविवार 8 जून 2025 रोजी त्रिशा झिप-लाइन खेळत असताना, तिला जोडलेला बेल्ट अचानक तुटला आणि ती 30 फूट खाली कोसळली. सुदैवाने, झिप-लाइनची उंची जास्त नसल्याने आणि त्रिशा उतरण्याच्या ठिकाणाजवळ असल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र, या अपघातात तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. या दुर्घटनेनंतर त्रिशावर सुरुवातील मनाली आणि नंतर चंदीगडमध्ये उपचार करण्यात आले. सध्या तिच्यावर नागपूर येथे उपचार सुरू आहेत. या घटनेचा एक व्हिडीओ देखील कुटुंबीयांनी शेअर केला असून, सोशल मीडियावर तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.




















