
जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२५
राज्यातील विधानमंडळाच्या अधिवेशनादरम्यान रमी खेळणाऱ्या तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याने छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना सूरज चव्हाण यांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर सूरज चव्हाण यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र अवघ्या महिन्याच्या आतच त्यांचे राजकीय पुनर्वसन झाले असून, त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, आमदार आदिती तटकरे, नवाब मलिक आणि समीर भुजबळ यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत कृषिमंत्री कोकाटे मोबाईलवर रमी खेळताना दिसले होते, त्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त होत आंदोलने सुरू झाली. याच पार्श्वभूमीवर लातूरमध्ये झालेल्या कार्यकर्ता संवाद कार्यक्रमात छावा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर विजय घाडगे यांनी कृषिमंत्र्यांचा राजीनामा मागितला आणि निषेध म्हणून पत्ते फेकले. या घटनेनंतर सूरज चव्हाण यांनी घाडगे यांना कोपरापासून ढोपरापर्यंत मारल्याचा आरोप करण्यात आला होता.
यावेळी चिडलेल्या सूरज चव्हाण यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजय घाडगे यांना मारहाण केली. घाडगे यांना कोपऱ्यापासून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकारानंतर सूरज चव्हाण यांच्यावर कारवाई करत त्यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली.




















