
जळगाव मिरर | १६ ऑगस्ट २०२५
राज्यातील अनेक शहरात अनेक धक्कादायक घटना उघडकीस येत असतांना आता छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील खिर्डी गाव गुरुवारी दुपारी एका हृदयद्रावक घटना समोर आली आहे. पुनम अशोक पवार (वय १३) या अल्पवयीन मुलीने केवळ रागाच्या भरात गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी दुपारी सुमारे तीन वाजता गावातील गल्लीत खेळत असताना पुनमचा काही लहान मुलांशी वाद झाला. त्या वेळी तिच्या घरात कोणीच नसल्याने ती रागाच्या भरात घरी गेली. दरवाजा आतून बंद करून, आजीच्या लुगड्याच्या सहाय्याने गळफास घेऊन तिने आपली जीवनयात्रा संपवली. वडील आणि आजी घरी परतल्यावर त्यांनी ही धक्कादायक घटना पाहिली. तिला तातडीने देवगाव रंगारी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले, परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तिला मृत घोषित केले.
या प्रकरणी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, शिवूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन ओगले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेमुळे खिर्डी गावात हळहळ व्यक्त होत असून, रागाच्या क्षणिक आवेगाने जीव गमावण्याच्या या प्रकाराने सर्वत्र दुःख आणि चिंता पसरली आहे.




















