
जळगाव मिरर | २२ ऑगस्ट २०२५
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील विरोधक महायुती सरकारला कर्जमाफीची मागणी करीत असतांना आता राज्य सरकारच्या वतीने वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याने आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. अहिल्या नगर जिल्ह्यामधील नेवासा तालुक्यातील शेतकरी बाबासाहेब सरोदे या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. या पार्श्वभूमीवर अजित पवार बोलत होते. योग्य वेळी शेतकऱ्यांची कर्ज माफी करू, असे आश्वासन देखील अजित पवार यांनी दिले आहे.
अजित पवार म्हणाले की, वीस हजार कोटींचा भार वीज बिल माफ करून बळीराजाला मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय राज्य सरकारच्या वतीने घेतला आहे. तर 45 हजार कोटींचा भार लाडक्या बहिणीच्या निमित्ताने उचललेला आहे. शेतकऱ्यांच्या घरातीलच आमच्या बहिणींना देखील या माध्यमातून मदत होत आहे. वेगवेगळ्या पद्धतीने बळीराजाला मदत करण्याचे काम शासनाच्या वतीने केले जात आहे. मात्र, आत्महत्या करेपर्यंत असे टोकाचे पाऊल कुठल्याही शेतकऱ्याने किंवा बळीराजाने उचलू नये, असे आवाहन अजित पवार यांनी केले.
योग्य वेळेला कर्जमाफी करू असे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या आधी सांगितलेले आहे. अजित पवार यांनी देखील कर्जमाफी करण्याचा निर्णय घेणार असल्याचे सांगितले आहे. हळूहळू सरकारच्या वतीने त्याची तयारी केली जात असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी देखील म्हटले आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याचे राज्य सरकारसमोर मोठे आव्हान आहे.
वास्तविक अजित पवार यांनी मे महिन्यात आपण शेतकरी कर्जमाफीचे कोणतेच आश्वासन दिलेले नाही, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे राज्यात चांगलेच वादंग उठले होते. मात्र, त्यानंतर ऑगस्ट महिन्यात योग्य वेळ आली की शेतकऱ्यांना कर्ज माफी दिली जाणार असल्याचे म्हणत अजित पवार यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला होता. राज्यातील शेतकऱ्यांकडून कर्ज माफीची मागणी सातत्याने करण्यात येत आहे.




















