
जळगाव मिरर | २५ ऑगस्ट २०२५
राज्यातील मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी येत्या 27 तारखेला सकाळी 10 वा. मुंबईच्या दिशेने कूच करण्याची घोषणा केली आहे. मराठा आंदोलक आरक्षणाच्या मागणीसाठी बुधवारी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघतील. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी ते मुंबईतील आझाद मैदानात पोहोचतील, असे त्यांनी आज येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत सांगितले. आरक्षण न दिल्यास सरकार उलथवून टाकेन, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
मनोज जरांगे आपल्या मुंबईकडे जाण्याच्या मार्गाची माहिती देताना म्हणाले, आम्ही बुधवारी सकाळी 10 वा. आंतरवाली सराटी येथून मुंबईच्या दिशेने निघणार. त्यानंतर महाकाळा, शहागड, शहागड चौक, वडीगंधारी फाटा, डोंगलगाव फाटा, साष्ट पिंपळगाव, बळेगाव, आपेगाव फाटा, हिरडपुरी, आंबेटाकळी, नवगाव, तुळजापूर, वडवळी, आपेगाव माउलींचे, वाघाडी, पैठण, उंचेगाव, पाटेगाव, तळणी, शेवगाव, वडुली, मळेगाव, मिरी नाका, पांढरी पूल, अहिल्यानगरच्या बायपासमार्ग कल्याण फाट्यावर जाणार. तेथून पुढे आळेगाव, नारायण गाव आणि 27 ऑगस्ट रोजी जुन्नर येथील शिवनेरी गडावर पोहोचणार आहेत.
28 ऑगस्ट रोजी सकाळी शिवनेरी गडावरील पवित्र माती कपाळावर लावून राजगुरू खेड मार्गे आपण चाकणला जाऊ. तेथून तळेगाव, लोणावळा, पणवेल, वाशी, चेंबूर मार्गे 28 ऑगस्ट रोजी सायंकाळी आपण आझाद मैदानाला पोहोचणार. त्यानंतर 29 ऑगस्ट रोजी सकाळपासून आपले आझाद मैदानावर उपोषण सुरू होईल, असे जरांगे यांनी सांगितले.
सरकारकडून देण्यात आलेले 10 टक्के आरक्षण कधीही जाऊ शकते. आम्हाला आमच्या हक्काची जमीन द्या, भाड्याने घर देऊ नका, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली. दीडशे वर्षांपूर्वी आमच्या नोंदी आहेत, पण सग्यासोयऱ्यांचा आदेश काढून दीड वर्ष झाली तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. मराठा अजूनही संयमी आहे, त्याची व्याख्या देण्यात आली आहे.
सगेसोयरे का घ्यायचे यासाठी तीन-चार पॅराग्राफ त्यांनी केलेले आहेत. आम्ही त्यांना सांगितले होते, आमचे शब्द घ्या. पुन्हा पुन्हा घोळ होईल. पण तुम्ही प्रत्येकवेळी ते शब्द घ्यायला टाळत आहात. ज्यांची कुणबी नोंद सापडली, त्यांचे सगेसोयरे घ्यायचे. कारण त्याची पोटजात-उपजात म्हणून ते घ्यायचे आहेत.




















