
जळगाव मिरर | २७ जानेवारी २०२६
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील साकरी गावात माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली असून, दोन अल्पवयीन शाळकरी मुलींना विहिरीत ढकलून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. या संतापजनक घटनेनंतर साकरी गावात उद्रेक झाला असून ग्रामस्थांचा संताप अनावर झाला आहे.
मृत झालेल्या दोन्ही मुली गावातीलच रहिवासी असून त्या नियमितपणे शाळेत जात होत्या. आज सकाळी शाळेत जाण्याच्या वेळेत गावालगतच्या एका विहिरीजवळ हा भीषण प्रकार घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. निष्पाप मुलींना विहिरीत ढकलून ठार मारण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात असून, या घटनेने पालकांसह संपूर्ण गाव भयभीत झाले आहे.
या प्रकरणातील संशयित आरोपी रोहन नरेंद्र चौधरी याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर ग्रामस्थांचा संताप उफाळून आला. आरोपीला पोलिसांच्या ताब्यातून सोडवून घेण्याचा प्रयत्न ग्रामस्थांनी केला. आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी आक्रमक मागणी करत ग्रामस्थांनी पोलिसांशी थेट वाद घातला. यामुळे गावात तणावपूर्ण व स्फोटक परिस्थिती निर्माण झाली.
दरम्यान, जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू आहे. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असला तरी मृतदेह ताब्यात घेण्यात होत असलेल्या विलंबामुळे ग्रामस्थ अधिकच आक्रमक झाले. मृतदेह तात्काळ ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी रोष व्यक्त केला.
पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेऊन कसून चौकशी सुरू केली असून, हत्या कोणत्या कारणातून आणि कोणत्या पद्धतीने करण्यात आली, याबाबत अद्याप ठोस माहिती समोर आलेली नाही. मात्र, या क्रूर घटनेने साकरी गावात भीती, संताप आणि शोककळा यांचे वातावरण पसरले असून, संपूर्ण भुसावळ तालुका हादरून गेला आहे.




















