पालकमंत्र्यांचे हस्ते,खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शनाचे उद्घाटन : कृषी, संस्कृती व ग्रामीण जीवनाचा संगम जळगावात
जळगाव मिरर | १ फेब्रुवारी २०२६
नव्या पिढीने आधुनिक शेती विषयी नवनवीन माहिती घेऊन आधुनिक शेतीकडे वळणे आवश्यक आहे तसेच शेतीमध्ये “ए आय “या तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे.असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. खान्देशची समृद्ध कृषी परंपरा, लोकसंस्कृती आणि पशुधनाचा वारसा जपणाऱ्या ‘खान्देश कृषी संस्कृती व पशुप्रदर्शन २०२६’ या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन आज राज्याचे पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शिवतीर्थ मैदान, जळगाव येथे झाले त्यावेळी ते बोलत होते.
उद्घाटनप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रोहन घुगे,जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करणवाल, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ महेश्वरी रेड्डी, महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी प्रकल्प संचालक राजू लोखंडे, जिल्हा कृषी अधीक्षक कुरबान तडवी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
भाषणाच्या सुरुवातीला पालकमंत्री यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करत, शेतकरी, कामगार, महिला आणि युवकांचे एक मार्गदर्शक व्यक्तिमत्त्व आपण गमावल्याची भावना व्यक्त केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील पुढे म्हणाले, आधुनिक शेती करण्यासाठी आज बरीचशी माहिती उपलब्ध आहे तिचा वापर करून युवकांनी शेतीमध्ये चांगले उत्पादने घ्यावे, युवकांनी शेतीकडे व्यवसाय म्हणून पहावे आणि आधुनिक शेती स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर कृषी, पशुसंवर्धन आणि संस्कृती या तिन्ही घटकांचा संगम साधणारा हा महोत्सव असून, भविष्यात तो राज्यात आणि देशातही ओळख निर्माण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “हा महोत्सव म्हणजे जिल्ह्याचा अभिमान आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिला बचत गटांनी आज गावाची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. “महिला म्हणजे फक्त घराची जबाबदारी सांभाळणाऱ्या नाहीत, तर त्या संपूर्ण गावाच्या विकासाच्या शिल्पकार आहेत,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले. शेतकरी आणि पशुधन यांचे नाते अतूट असल्याचे सांगत पालकमंत्री म्हणाले की, ग्रामीण भागात जनावर म्हणजे केवळ मालमत्ता नसून कुटुंबाचा अविभाज्य घटक आहे. पशुपालनामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचेही त्यांनी नमूद करून ते म्हणाले सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे.
जिल्हाधिकारी श्री घुगे आपल्या मनोगत म्हणाले, जळगाव जिल्हा कृषी प्रधान जिल्हा असून, खाद्य संस्कृतीचा जिल्हा आहे.कृषी विभागाचे संवर्धन व्हावे या उद्देशाने खान्देशी संस्कृतीचा महोत्सव ही संकल्पना लक्षात घेऊन हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कृषी प्रदर्शनात कृषी तंत्रज्ञानाचा वापर कसा करावा, पशुसंवर्धन मत्स्य संवर्धन कसे करावे यासह शासनाच्या योजनांची माहिती, विविध खाद्यपदार्थ स्टॉल या ठिकाणी लावण्यात आले असून शाळा महाविद्यालयाच्या सहली, शेती विषयावर चर्चासत्र सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी पुढील पाच दिवस करण्यात येणार आहे याचा जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
प्रास्ताविकात, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी कृषी प्रदर्शन आयोजना विषयी सविस्तर माहिती सांगितली. कार्यक्रमात, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यामार्फत तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिका व डायरीचे तसेच कृषी विभागातर्फे तयार करण्यात आलेल्या महाविस्तार ए आय ॲप, प्रकाशन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री श्री पाटील यांनी या प्रदर्शनस्थळी लावण्यात आलेले विविध स्टॉलला भेट देऊन माहिती जाणून घेतली. तसेच पालकमंत्री यांनी प्रदर्शनातील स्टॉलवरुन स्वत: वस्तू खरेदी करुन इतरांना प्रोहत्सान दिले. यावेळी कार्यक्रमात विविध सांस्कृतीक कार्यक्रम सादर करण्यात आले.
प्रदर्शनाची वैशिष्टे :-
प्रदर्शनात कृषी निविष्ठा, अवजारे व साहित्याचे भव्य प्रदर्शन, शासकीय योजनांची सविस्तर माहिती व विविध प्रात्यक्षिकांची मांडणी, तसेच हस्तकला व गृहसजावटीच्या वस्तूंची आकर्षक दालने नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. कृषी व पशू विभागामार्फत शेतकरी बांधवांसाठी मार्गदर्शन, चर्चासत्रे, उद्योजकता विकास व महिला सक्षमीकरण कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रदर्शनाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे अहिराणी लोकपरंपरा व संस्कृतीचे सजीव दर्शन, पारंपरिक लोककला व लोकनृत्यांचे सादरीकरण आणि अस्सल महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थांची जत्रा. खवय्यांसाठी विविध खाद्यपदार्थांची पर्वणी आहे.
हे प्रदर्शन दि. १ ते ५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत दररोज सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले राहणार असून, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.कार्यक्रमाला शेतकरी बांधव, महिला बचत गट प्रतिनिधी, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी आभार व्यक्त केले.





















