
जळगाव मिरर | ४ फेब्रुवारी २०२६
भडगाव येथील आदर्श शाळेनजीक दोन निरागस बालकांच्या मृत्यू प्रकरणी अटकेत असलेल्या पाच जणांची खंडपीठाने मानवी दृष्टिकोनातून विचार करत जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील महात्मा फुले शिक्षण प्रसारक मंडळ संचालित आदर्श कन्या शाळेतील इंग्लिश मीडियम नर्सरीत शिकणाऱ्या अंश सागर तहसीलदार (३) आणि मयंक ज्ञानेश्वर वाघ (४) अशा दोन चिमकुल्यांचा संरक्षक भिंतीला लागून असलेल्या नाल्यात पडून बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला होता. ही घटना १६ डिसेंबर २०२५ रोजी घडली होती. या प्रकरणी संचालक मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात संस्थेचे मानद सचिव दीपक संभाजी महाजन सह-सचिव रमेश एकनाथ महाजन, उपाध्यक्ष विनोद शिवराम महाजन, संचालक रवींद्र एकनाथ महाजन, मनोज कौतिक महाजन आणि प्राचार्या सोनिया भादू वंजारी यांना १६ डिसेंबर रोजी अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांची रवानगी नंदुरबार कारागृहात करण्यात आली होती.
त्यांनी जामिनासाठी औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला. त्यावर सोमवार दि. २ रोजी न्यायमूर्ती सचिन देशमुख यांच्या न्यायपीठासमोर सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान आरोपींच्या वतीने संभाव्य धोका लक्षात घेऊन शाळेच्या संरक्षणासाठी नगरपरिषदेकडे संरक्षक भिंत बांधण्याची मागणीही करण्यात आली होती, अशी माहिती देण्यात आली. मृत बालकांप्रती सहानुभूती व्यक्त करत, उच्च न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला. आरोपींच्या वतीने अॅड. व्ही. डी. होन आणि अॅड. भूषण महाजन यांनी काम पाहिले.




















