जळगाव मिरर | १२ फेब्रुवारी २०२६
लग्नासाठी पाळधी येथे जाणाऱ्या एका महिलेच्या पिशवीतून धावत्या बसमध्ये चोरट्यांनी तब्बल ३८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची धक्कादायक घटना १० फेब्रुवारी रोजी घडली. या प्रकारात महिलेचे अंदाजे ९० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील बारी वाडा भागातील रहिवासी सुनीता अशोक बारी (वय ५२) या जळगाव येथून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या बसने पाळधी (पहूर) येथे लग्नासाठी निघाल्या होत्या. प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या जवळील कापडी पिशवी धारदार वस्तूने कापून त्यातील दागिने लंपास केले.
चोरट्यांनी पिशवीत ठेवलेले ३२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (पेंडंटसह) तसेच ६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले असा एकूण ३८ ग्रॅम सोन्याचा ऐवज चोरून नेला. चोरीची घटना लक्षात येताच महिलेने तत्काळ तक्रार दाखल केली.
याप्रकरणी सुनीता बारी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस हवालदार भटू पाटील करीत आहेत. दरम्यान, धावत्या बसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, सार्वजनिक वाहतुकीत सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.





















