
जळगाव मिरर | २ मार्च २०२६
मित्राच्या सेवानिवृत्ती समारंभ आटोपून नाशिककडे परतणाऱ्या कारचा नवीन बायपासवर भीषण अपघात होऊन एकाचा मृत्यू तर तिघे जखमी झाल्याची घटना पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास भोकणी गावाजवळ घडली. या अपघातात सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी दीपक श्रीपतराव सोमवंशी (वय ५८, रा. नाशिक) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथील शिक्षक मित्राच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी नाशिक येथून दीपक सोमवंशी, दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार हे चौघे मित्र (एमएच १५, जीएक्स १८७२) क्रमांकाच्या कारने नशिराबाद येथे आले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर पहाटेच्या सुमारास ते नाशिककडे परतण्यासाठी निघाले. नवीन बायपासने जात असताना बांभोरी पुलाच्या पुढे भोकणी गावाजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनाला त्यांच्या कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला. या अपघातात दीपक सोमवंशी यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच पाळधी दूरक्षेत्र पोलिस ठाण्याचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णवाहिकेतून जिल्हा वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणीनंतर दीपक सोमवंशी यांना मृत घोषित केले. जखमी दीलीप सोमवंशी, ललित वासुदेव भंगाळे आणि राजू सरदार यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दीपक सोमवंशी हे भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झाल्यानंतर रेल्वे सेवेत कार्यरत होते. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्राच्या आनंदाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या चौघांवर माघारी जाताना दुर्दैवी काळाने झडप घातल्याची हळहळ व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पाळधी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. पहाटेच्या सुमारास भरधाव वेग व रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांमुळे अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.





















