
जळगाव मिरर | ३ मार्च २०२६
धुळे–सुरत राष्ट्रीय महामार्गावर सोमवारी दुपारच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात कारमधील सात जण गंभीर जखमी झाले. जखमींमध्ये दोन पुरुष, तीन महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असून, दोघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे. बहुतांश जखमी हे नवापूर येथे वास्तव्यास असून मूळचे धरणगाव तालुक्यातील असल्याचे समजते.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएच ०२ जेपी ८४६२ क्रमांकाची कार धुळ्याकडून सुरतच्या दिशेने वेगाने जात होती. महामार्गावरील एका हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला टीएन ९० डी ८९५२ क्रमांकाचा ट्रक उभा होता. कारचा वेग जास्त असल्याने चालकाला उभ्या ट्रकचा अंदाज आला नाही आणि कार थेट ट्रकच्या पाठीमागील भागावर जाऊन जोरदार धडकली. धडक इतकी जबरदस्त होती की कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला.
अपघातानंतर कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नांनंतर सर्वांना बाहेर काढून उपचारासाठी साक्री ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारांनंतर सर्व जखमींना पुढील उपचारासाठी धुळे जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय शिव भट याची प्रकृती स्थिर आहे; मात्र इतर सहा जणांची प्रकृती गंभीर असून त्यापैकी दोघांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
अपघातातील जखमींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : किरण राजेंद्र भट (वय ४०), सरिता भट (३७), राजश्री भट (६०), शोभा कुळकर्णी (६०), राजेंद्र भट (६५), गौरी भट (७) आणि शिव भट (३, रा. धरणगाव, जि. जळगाव).
दरम्यान, अपघाताचे नेमके कारण वेग असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक प्रशासनाने वाहनचालकांनी वेगावर नियंत्रण ठेवावे आणि रस्त्याच्या कडेला उभ्या वाहनांबाबत विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन केले आहे.




















