
जळगाव मिरर | ६ मार्च २०२६
वसुली अधिकाऱ्यांनी ३१ लाख १२ हजार रुपये कर्जाची रक्कम वसुल केल्यानंतर ती ‘भारत फायनान्स’ या खाजगी बँकेत न भरता, स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर केला. हा धक्कादायक प्रकार ८ डिसेंबर २०२२ ते १ ऑक्टोबर २०२३ या दरम्यान ऑडीट दरम्यान उघडकीस आला. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भारत फायनान्स या खासगी बँकेचे शाखा व्यवस्थापक मनिष देवचंद चौधरी (वय ३१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बँकेकडून कष्टकरी महिलांना कर्ज देण्यात आले होते. त्यापैकी ३३६ महिलांनी आपआपल्या भागातील बँकेच्या वसुली अधिकाऱ्यांकडे नियमितपणे जमा केले. मात्र, वसुली अधिकाऱ्यांनी ही जमा केलेली रक्कम बँकेत जमाच केली नाही. याबाबत महिलांकडून देखील बँकेने हप्ते मिळावे म्हणून पाठपुरावा केला. मात्र, महिलांनी ही रक्कम दिली असल्याचे म्हटले. त्यामुळेच बँकेकडून ऑडीट तपासणी करण्यात आले, त्यात वसुली झाल्याचे स्पष्ट झाले, मात्र, ही रक्कम बँकेकडे प्राप्त झाली नसल्याने वसुली अधिकाऱ्यांचे बिंग फुटले. हा सर्व गैरप्रकार दि. ८ डिसेंबर २०२२ ते दि. १ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला. बँकेकडून वार्षिक ऑडिट रिपोर्ट प्राप्त झाला, या ऑडीट रिपोर्ट पडताळणी दरम्यान, बँकेतून देण्यात आलेल्या कर्जाची रक्कम कर्जदार महिलांकडून वसुली अधिकाऱ्यांनी वसुल करण्यात आली हे स्पष्ट होते. मात्र ती बँकेच्या तिजोरीत जमा न करता स्वतःच्या फायद्यासाठी वापरल्याचे निष्पन्न झाले.
या अपहारात ३३६ कष्टकरी महिला कर्जदारांच्या हप्त्यावर वसुली अधिकाऱ्यांनी डल्ला मारला. यामध्ये संशयित शेख अबिद शादुल्ला (रा. सावरगाव, जि. बुलढाणा), या वसुली अधिकाऱ्याने २१५ महिला सदस्यांकडून ७ लाख १६ हजार रुपयांची वसुली केली. तसेच प्रदिप हरिचंद्र पवार (रा. कन्नड, जि. छत्रपती संभाजीनगर), याने ३४ महिलांकडून ८ लाख ७० हजार रुपये, अश्विन रविंद्र पाटील (रा. मुक्ताईनगर) याने ४९ महिलांकडून ६ लाख ८७ हजार रुपये, तर अक्षय शंकर बारी (रा. सोयगाव, जि. छत्रपती संभाजीनगर) याने २० महिलांकडून ४ लाख ९० हजार रुपये परस्पर हडपले, तर सचिन भिवसिंग राठोड (रा. सोयगाव जि. छत्रपती संभाजीनगर) याने १८ महिलांकडून ३ लाख ४७ रुपये घेतले. या पाच संशयित आरोपींनी एकूण ३१ लाख १२ हजार रुपयांचा डल्ला मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेने संबधित वसुली अधिकाऱ्यांना वारंवार ही रक्कम भरण्याच्या सूचना दिल्या. मात्र, वारंवार तगादा लावूनही संशटित आरोपींनी थकीत रक्कम जमा न केल्याने अखेर दि. ४ मार्च रोजी रात्री उशिरा रामानंदनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ हे करत आहेत.





















