
जळगाव मिरर | ९ मार्च २०२६
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने न्यूझीलंडला ९६ धावांनी हरवून आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये आपले नाव कोरले. या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देश आनंदात न्हालेला असून महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ढोलक-डीजेवर ठेका धरत नागरिकांनी विजयाचा आनंद साजरा केला. मात्र, सांगली, पुणे, अकोला आणि अमरावतीसारख्या काही शहरांमध्ये हा आनंद हळूहळू गालबोटात बदलला.
अकोल्यातील हरिहरपेठ परिसरात फटाके फोडण्यावरून दोन गटांत वाद झाला, जो दगडफेकीत रूपांतरित झाला. सोनटक्के प्लॉट आणि गाडगेनगर भागात दोन्ही गट आमनेसामने आल्याने चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली. काही नागरिक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले. अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. पोलिसांनी दोषींवर गुन्हे दाखल करण्यासाठी कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे.
सांगलीच्या मिरज येथील लक्ष्मी मार्केट परिसरात हजारो तरुणांच्या गर्दीमुळे हुल्लडबाजी झाली. पोलिसांच्या सततच्या सूचना फेटाळल्या गेल्या आणि अखेर सौम्य लाठीमार करून परिस्थिती पांगवावी लागली. शहराच्या मारुती चौकात फटाक्यांच्या आतषबाजीमुळे दुकानाच्या छतावरील पालापाचोळ्यावर आग लागली, पण वेळीच आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. फर्ग्युसन रोड (FC रोड) वर तरुणांनी नियमांची पायमलत करून हुल्लडबाजी केली. गर्दीमुळे वाहतुकीला बोजवारा उडाला, परिणामी पोलिसांनी बळाचा वापर करून गर्दी पांगवली.
राजकमल चौकात तरुणांनी एकमेकांच्या अंगावर थेट फटाके फेकत जीवघेणा जल्लोष केला. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले, आणि पोलिसांनी तातडीने मोठा बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली.एकीकडे, धुळे आणि भंडाऱ्यातील भागात नागरिकांनी ढोल-ताशांचा गजर आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भारतीय संघाच्या विजयाचा आनंद साजरा केला. तर काही शहरांत हुल्लडबाजीमुळे तणाव निर्माण झाला, हे राज्यातील पोलीस प्रशासनाला हाताळावे लागले. या विजयसोहळ्यातील उत्साह आणि हिंसाचाराची ही दोन्ही बाजू राज्यातील नागरिकांना जागरूकतेसाठी संदेश देत आहेत की, आनंद साजरा करताना नियमांचे पालन करणे किती महत्वाचे आहे.




















