
जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६
शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदन सादर करत महासभेत ठराव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा ते जकात सोसायटी तसेच श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मार्गांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारण्यात यावा. या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे नागरिकांचे मत आहे.
नागरिकांनी पुढे नमूद केले आहे की, छत्रपती संभाजी राजे हे रयतेचे खरे राजा होते. त्यांच्या शौर्य, त्याग आणि विशेषतः महिलांबद्दल असलेल्या उच्च विचारसरणीमुळे ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा पुतळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरेल. तसेच, प्रस्तावित पुतळ्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नसून, “सुंदर जळगाव” या संकल्पनेलाही चालना मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या मागणीसाठी नागरिकांनी तीन प्रमुख बाबी मांडल्या आहेत – स्वामी समर्थ चौकात पुतळा उभारणीसाठी महासभेत ठराव मंजूर करणे, चौकातील जागा उपलब्ध करून देणे आणि या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करणे.
यावेळी परिसरातील नगरसेवक गणेश सोनवणे उपस्थित होते. या निवेदनावर संदीप मांडोळे, संजय सपकाळ, ज्ञानेश्वर पाटील, महेश माळी, नंदू पुराणिक, संजय जगताप, विशाल पाटील, दीपक मांडोळे, सचिन वाघ, अॅड. ललित तेली, हर्षल वाणी, विजय पाटील यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






















