
जळगाव मिरर | २७ एप्रिल २०२६
राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात नवी रंगत निर्माण झाली आहे. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकांचा गडगडाट ओसरत नाही तोच आता १२ मे रोजी होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत संभाव्य उमेदवारांच्या नावांवरून मोठी नाराजी उफाळून आली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नीलम गोऱ्हे आणि बच्चू कडू यांच्या नावांवर चर्चा सुरू आहे. मात्र, या दोन्ही नावांना पक्षातील काही ज्येष्ठ नेते आणि मंत्र्यांकडून तीव्र विरोध होत असल्याचे समोर येत आहे. पक्षातील नाराजीचा सूर स्पष्ट करताना काही नेत्यांनी मत व्यक्त केले की, “राज्यसभेसाठी ज्योती वाघमारे यांच्यासारखा नवा आणि आक्रमक चेहरा दिला गेला, तर विधान परिषदेसाठीही तोच निकष लागू करायला हवा.” जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी निष्ठावंत कार्यकर्त्यांना वाव मिळावा, अशी मागणी आता जोर धरत आहे.
दुसरीकडे, बच्चू कडू यांच्या संभाव्य उमेदवारीवरूनही पक्षात मोठी खळबळ उडाली आहे. “बच्चू कडू यांचा शिवसेनेशी थेट संबंध काय?” असा सवाल उपस्थित करत काही नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. जर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपली प्रहार जनशक्ती संघटना शिवसेनेत विलीन करावी, अशी अटही शिंदेंसमोर मांडण्यात आल्याची चर्चा आहे.
संख्याबळाच्या गणितात शिवसेना सध्या मजबूत स्थितीत आहे. पक्षाकडे विधानसभेत ५७ आमदारांचे संख्याबळ असून, विधान परिषद निवडणुकीत एका उमेदवाराला विजयी होण्यासाठी २८ मतांचा कोटा आवश्यक आहे. त्यामुळे शिवसेनेच्या दोन जागा सुरक्षित मानल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांची संख्या मोठी असल्याने अंतर्गत स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे.
दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख ३० एप्रिल असल्याने निर्णयासाठी फारच कमी वेळ उरला आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे पक्षातील नाराजी दूर करत जुन्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवतात की नव्या नेतृत्वाला संधी देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकूणच, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत राजकारण उफाळून आले असून, येत्या काही दिवसांत होणारे निर्णय राज्याच्या राजकीय समीकरणांवर परिणाम करणारे ठरण्याची शक्यता आहे.





















