
जळगाव मिरर | ११ मे २०२६
सामाजिक सलोखा, शांतता आणि एकतेचा संदेश देणारा अनोखा उपक्रम भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या वतीने दंगलग्रस्त कॉलनी परिसरात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार राजू मामा भोळे यांच्या हस्ते वृक्षरोपण व वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले. तसेच भाजप अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकर्ते वसीम खान यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत त्यांना नियुक्तीपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमामुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान सामाजिक ऐक्य आणि विकासाचा संदेश देण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार राजू मामा भोळे यांनी मोठी घोषणा करत दंगलग्रस्त कॉलनीला “अब्दुल कलाम नगर” हे नाव देण्यात येणार असल्याचे सांगितले. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विचारांमधून प्रेरणा घेत हा परिसर विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“भाजप हा सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. समाजात शांतता, बंधुता आणि विकासाचे वातावरण निर्माण करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असेही आमदार भोळे यांनी स्पष्ट केले. त्यांच्या घोषणेनंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी जल्लोष करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमादरम्यान अनेक मुस्लिम बांधवांनी भाजप पक्षात प्रवेश करत सदस्यत्व स्वीकारले. अल्पसंख्यांक मोर्चाच्या या उपक्रमामुळे सामाजिक सलोखा अधिक दृढ होण्यास मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान यांनी आपल्या मनोगतात भाजपाच्या माध्यमातून अल्पसंख्यांक समाजाच्या विकासासाठी अधिक वेगाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला. “समाजातील प्रत्येक घटकापर्यंत विकासाच्या योजना पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे ते म्हणाले. या कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, अल्पसंख्यांक मोर्चाचे कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















