
जळगाव मिरर | १ जुलै २०२६

आषाढी वारीसाठी बेलदारवाडी (ता. चाळीसगाव) येथील ज्ञानेश्वर माऊर्लीच्या दिंडीला मार्गस्थ करून परतत असताना कजगावजवळ महिंदळे (ता. भडगाव) येथील भाविकांच्या टॅक्टरचे डिझेल संपले. त्यामुळे त्यांनी ट्रॉलीतच विश्राम करण्याचा निर्णय घेतला. परंतु गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या वाहनाने टॅक्टर व ट्रॉलीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॉलीत झोपलेल्या दिनकर शेनपडू भदाणे (वय ५५, महिंदळे) यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिलांसह १५ जण जखमी झाले. रविवारी मध्यरात्री ही घटना घडली.
अपघातातील एका जखमीला उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे हलविण्यात आले आहे. महिंदळे परिसरातील १०० ते १५० भाविक दरवर्षी बेलदारवाडी येथील ज्ञानेश्वर माऊलींच्या आषाढी दिंडीत सहभागी होतात. यंदा शनिवारी दिंडी मार्गस्थ केल्यानंतर भाविक ट्रॅक्टर-ट्रॉलीने परतीच्या प्रवासाला निघाले. मात्र, कजगावाजवळ ट्रॅक्टरचे डिझेल संपल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करण्यात आले. त्याचवेळी मागून भरधाव आलेल्या गॅस सिलिंडर नेणाऱ्या वाहनाने ट्रॉलीला धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की, ट्रॅक्टर-ट्रॉलीचे दोन तुकडे झाले. यात दिनकर भदाणे यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातात सतिलाल नरसिंग पाटील (वय ४५), शशिकांतबाई जगदीश पाटील (२६), जगदीश निंबा पाटील (३५), नंदू ताकतसिंग पाटील (४०), पंकज जुलाल पाटील (३५), जोहरलाल नंदा पाटील (६०), भगवान निंबा पाटील (४४), दिलीप उदयसिंग पाटील (७०), रावसाहेब बाळू पाटील (४५), अमोल सुरेश पाटील (३०), अविनाश लुभान पाटील (४०), नथाबाई रमेश मिस्तरी (५५), बाबूलाल महादू बच्छाव (६०) आणि महेश बाळकृष्ण कुलकर्णी (३५) हे जखमी झाले आहेत. सर्वांवर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक महेश टाक, कजगाव पोलिस मदत केंद्राचे पोलिस कॉन्स्टेबल किशोर सोनवणे यांनी जखमींना उपचारासाठी खाना केले.




















