जळगाव मिरर | ९ जुलै २०२६
प्रसूतीनंतर स्वतःच्या नवजात बाळाला नाल्यात टाकून जीव धोक्यात घालणाऱ्या चोपडा तालुक्यातील एका महिलेला अमळनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश छाया पाटील यांनी हा निकाल देत आरोपी महिलेला दोषी ठरविले.

या प्रकरणाची घटना ६ ऑगस्ट २०२२ रोजी चोपडा तालुक्यातील एका गावात घडली होती. गावात उत्तरकार्याचा कार्यक्रम सुरू असताना काही नागरिकांना नाल्याकडून नवजात बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. नागरिकांनी तातडीने ही माहिती गावातील पोलीस पाटलांना दिली. पोलीस पाटलांनी घटनास्थळी धाव घेत बाळाला नाल्यातून बाहेर काढले, कापडात गुंडाळले आणि तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्यामुळे बाळाचा जीव वाचविण्यात यश आले.
या घटनेनंतर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत गावातील अलीकडे प्रसूती झालेल्या महिलांची माहिती गोळा केली. आशा स्वयंसेविका, आरोग्य सेविका आणि आरोग्य विभागाच्या मदतीने तपास करण्यात आला. तपासादरम्यान एका महिलेची अधिकृत प्रसूती नोंद नसल्याचे आढळून आले. संशयाच्या आधारे तिची चौकशी करण्यात आली असता तिने बाळाला जन्म दिल्यानंतर नाल्यात टाकल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान डीएनए चाचणीद्वारे नवजात बाळ आणि संबंधित महिलेतील जैविक नाते सिद्ध झाले. त्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. अमळनेर जिल्हा व सत्र न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे अॅड. किशोर बागुल-मंगरुळकर यांनी प्रभावी युक्तिवाद केला. पोलीस पाटील, आशा सेविका, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी तसेच डीएनए अहवालाच्या आधारे न्यायालयाने आरोपी महिलेला दोषी ठरवत तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. या निकालामुळे नवजात बालकांविरुद्ध होणाऱ्या गंभीर गुन्ह्यांबाबत न्यायालयाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून, अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.





















