जळगाव मिरर | ५ जुलै २०२६
समग्र शिक्षा अभियानांतर्गत १५ ते २० वर्षांपासून करार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचा शासकीय सेवेत समायोजन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतल्यानंतर जळगाव जिल्हा समग्र शिक्षा अभियान कर्मचारी संघटनेच्या वतीने राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. समग्र शिक्षा अभियान करार पद्धतीवरील कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. या निर्णयासाठी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या निर्णयामुळे जळगाव जिल्ह्यातील संगणक प्रोग्रामर (१), सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (२), वरिष्ठ लेखा सहायक (१२), डाटा एन्ट्री ऑपरेटर (१२), कनिष्ठ अभियंता (५), एमआयएस कॉर्डिनेटर (५) आणि विषय साधन व्यक्ती (३९) अशा एकूण ७६ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत समायोजनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना रोजगाराचे स्थैर्य, आर्थिक सुरक्षितता आणि सामाजिक विश्वास प्राप्त होणार असून शिक्षण व्यवस्थेलाही बळकटी मिळणार आहे.
यावेळी सत्काराला उत्तर देताना पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, समग्र शिक्षा करार कर्मचाऱ्यांच्या शासकीय सेवेतील समायोजनाचा निर्णय शासनाने घेतल्याबद्दल राज्य शासनाचे मी मनःपूर्वक स्वागत करतो. जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्याची संधी मला मिळाली, याचे समाधान आहे. कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून त्यांनी या कर्मचाऱ्यांना पुढील शासकीय सेवेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी यापुढेही शिक्षण क्षेत्राच्या उन्नतीसाठी त्याच निष्ठेने आणि समर्पित भावनेने कार्य करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या सत्कार प्रसंगी जिल्ह्यातील समग्र कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी तसेच समग्र कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी निलेश पाटील, गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे, शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, गटशिक्षणाधिकारी अजित तडवी, शिक्षण विस्तार अधिकारी जितेंद्र चिंचोले, अल्लाउद्दीन बेलदार, विजय पवार यांच्यासह समग्र शिक्षा अभियान व शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





















