जळगाव मिरर | १ ऑगस्ट २०२६
अमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात जळगाव जिल्हा पोलिसांनी आणखी एक धडाकेबाज कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) तस्करीला मोठा हादरा दिला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि एमआयडीसी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून ६२.०७ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) हा घातक अमली पदार्थ जप्त केला. या कारवाईत एका संशयिताला अटक करण्यात आली असून तब्बल ₹३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच तपासादरम्यान मालेगाव येथील एका पुरवठादाराचाही सहभाग उघड झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १०.४० वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वखार महामंडळ (एफसीआय गोडाऊन), सेक्टर क्रमांक ए-१४ समोरील रस्त्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत होते. यावेळी संशयास्पद हालचाली करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एमडी (मेफेड्रोन) हा अमली पदार्थ आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तात्काळ अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव इम्रान खान हयात खान (वय ३६) असे असून तो मूळचा आडगाव (ता. जळगाव) येथील रहिवासी असून सध्या एमआयडीसी परिसरातील करीमनगर, फातिमा नगर येथे वास्तव्यास आहे. तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला एमडी हा रफीक उर्फ गोल्डन (रा. मालेगाव, जि. नाशिक) याने विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे.
या कारवाईत पोलिसांनी आरोपीकडून ३९.०६ ग्रॅम एमडी (किंमत ₹१.९६ लाख), ११ प्लास्टिक पिशव्यांमध्ये ९.१० ग्रॅम एमडी (किंमत ₹३६ हजार) आणि १८ प्लास्टिक पिशव्यांमध्ये १३.९१ ग्रॅम एमडी (किंमत ₹५६ हजार) असा एकूण ६२.०७ ग्रॅम एमडी, ज्याची किंमत ₹२.८८ लाख आहे, जप्त केला. याशिवाय एक रिअलमी कंपनीचा मोबाईल फोन (₹२० हजार) आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटारसायकल (₹५० हजार) असा एकूण ₹३ लाख ५८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६३५/२०२६ अन्वये एनडीपीएस कायदा १९८५ मधील कलम ८(क), २२(क), २९ तसेच भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात सहायक पोलीस फौजदार अतुल रघुनाथ वंजारी यांनी फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे हे पुढील तपास करीत आहेत.




















