जळगाव मिरर | ५ ऑगस्ट २०२६
जामनेर तालुक्यातील ग्रोदी येथील डालकी धबधब्यावर बुलढाण्यातील आठ ते दहा तरुण फिरण्यासाठी आले होते. धबधब्याच्या पाण्यात अंघोळ करीत असतांना पाय घसरुन पडल्याने आकाश अरुण पडघाण (वय २२, रा. बुलढाणा) हा तरुण गंभीर जखमी होवून त्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील आकाश पडघाण हा तरुण आपल्या आठ ते दहा मित्रांसोबत जामनेर तालुक्यातील गोद्री येथील डालकी धबधब्यावर पर्यटनासाठी आला होता. धबधब्याच्या वरच्या बाजूला पात्रात अंघोळ करत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली थेट वरच्या धबधब्यावरुन खाली खडकावर जाऊन पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला व चेहऱ्याला अत्यंत गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर मित्रांनी तातडीने मदत मिळवण्याचा प्रयत्न केला. अपघात घडला तेव्हा तो शुद्धीत होता आणि बोलतही होता. गंभीर जखमी झालेल्या आकाश पडघाण याला मित्रांनी तात्काळ उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणण्यात येत होते. मात्र, रुग्णालय अवघ्या ५ ते ७ किलोमीटर अंतरावर असतानाच अचानक प्रकृती खालवल्याने आकाशची प्राणज्योत मालवली. रुग्णालयात डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यानंतर त्याच्या मित्रांना अश्रू अनावर झाले होते.
घटनेच्या वेळी धबधबा परिसरात अनेक पर्यटक उपस्थित होते. मात्र, अपघात घडल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या तरुणाला तातडीने रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे किंवा त्याला उचलून वर आणण्यासाठी उपस्थित लोकांकडून योग्य ती मदत मिळाली नाही, अशी खंत त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी व्यक्त केली. वेळेवर मदत आणि वाहतूक व्यवस्था मिळाली असती तर कदाचित तरुणाचे प्राण वाचू शकले असते असेही ते यावेळी म्हणाले. मयत आकाश पडघण याने आपले पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले होते. सध्या तो हातमजुरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. त्याच्या पश्चात आई-वडील आणि तीन बहिणी असा परिवार आहे. तीन बहिणींमध्ये तो एकुलता एक भाऊ होता. त्याच्या अचानक जाण्याने पडघण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.




















