जळगाव मिरर | १७ सप्टेंबर २०२६
अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २७ वर्षीय महिलेच्या घरात शिरुन तीचा विनयभंग केल्याची घटना दि १३ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ ते दहा वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच अमळनेर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावात राहणारी २७ वर्षीय महिला घरात एकटी असताना गावातील श्याम महाजन (वय ३०) हा घरात घुसला. त्याने महिलेशी अंगलट करून तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. महिलेने प्रतिकार केला असता तिच्या अंगावरील कपडे फाटले. महिलेने आरडाओरड केल्याने शेजारील एक महिला धावत घरात आली, तेव्हा श्याम महाजन तेथून पळून गेला. त्यानंतर महिलेची सासूही तेथे आली.
सायंकाळी पती व सासरे शेतातून घरी आल्यानंतर महिलेने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर पती व सासरे श्याम महाजन याला जाब विचारण्यासाठी गेले असता त्याने महिलेला लाकडी दांडक्याने पायावर व पाठिवर मारहाण करून दुखापत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. महिलेच्या सासऱ्याने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने उर्मट भाषा वापरून दादागिरी केल्याने अपमानित झाल्याच्या भावनेतून महिलेच्या सासऱ्याने विष प्राशन केले. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले. याप्रकरणी महिलेने अमळनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर संशयित आरोपी श्याम महाजन याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल गणेश पाटील करीत आहेत.





















