जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२६
धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे व्याही यांच्याकडे आलेल्या प्रभावती पंडीतराव विसपुते (वय ६०, रा. शिवाजीनगर धुळे) या महिलेच्या बॅगेतून २८ ग्रॅमची सोन्याची माळ, ५ ग्रॅमची अंगठी असा एकूण ९० हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरुन नेला. ही घटना दि. १२ रोजी सायंकाळी बसमध्ये चढतांना नवीन बस स्थानकात घडली. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे येथील वाडी भोकर येथे राहणाऱ्या प्रभावती विसपुते या वृद्ध महिला जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे व्याहींकडे आल्या होत्या. दि. १२ सप्टेंबर रोजी धुळे येथे परत जाण्याकरीता त्या नवीन बस स्थानक येथे आल्या. दरम्यान, सायंकाळच्या सुमारास त्या धुळे जाण्याकरीता बसमध्ये चढत असतांना गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी प्रभावती विसपुते यांच्या बॅगेतून २८ ग्रॅमची सोन्याची माळ व ५ ग्रॅमची सोन्याची अंगठी असा एकूण ९० हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला.
बसमध्ये चढल्यानंतर प्रभावती विसपुते यांना बॅग उघडी दिसल्यामुळे त्यांनी लागलीच बॅगेत ठेवलेले दागिने तपासले. यावेळी त्यांना बॅगेतून दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांना धक्का बसला. दरम्यान, महिलेने तात्काळ जिल्हापेठ पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोहेकॉ गणेश शिरसाळे हे करीत आहे.
नवीन बस स्थानकातून वृद्ध महिलेचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी नवीन बस स्थानकातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र संशयित चोरटे यामध्ये दिसून न आल्याने पोलिसांकडून संशयिताचा शोध घेण्यास अडचणी निर्माण होत आहे





















