मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून ‘मुलींना हुंडा नको, लग्नात वृक्षांच्या बिया द्या!’ हा अनोखा संदेश
जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२६

तुळशी विवाहाच्या मंगलमय मुहूर्तावर संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरूण येथे आनंददायी शनिवार उपक्रमांतर्गत पर्यावरण संवर्धन आणि सामाजिक परिवर्तनाचा अनोखा संदेश देण्यात आला. मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या संकल्पनेतून विद्यालयात १०० विद्यार्थ्यांची ‘१०० ग्रीन आर्मी’ तयार करण्यात आली आहे.
शाळेत पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या या १०० ग्रीन आर्मी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी युवा उद्योजक अल्पेश भाऊ देवरे यांच्या देवरे कन्स्ट्रक्शनच्या वतीने ११ हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली. या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाच्या कार्यात सहभागी विद्यार्थ्यांना नवी ओळख आणि प्रेरणा मिळणार आहे.
यावेळी ‘मुलींना हुंडा नको, लग्नामध्ये वृक्षांच्या बिया द्या!’ हा सामाजिक व पर्यावरणपूरक संदेश देण्यात आला. लग्नसमारंभात हुंडा आणि महागड्या भेटवस्तू देण्याऐवजी नवदाम्पत्याला विविध वृक्षांच्या बिया भेट देऊन त्यांच्या नव्या संसाराची सुरुवात हरित विचारांनी करावी, असे आवाहन करण्यात आले.
बीज संकलन, वृक्षसंवर्धन, जलसंवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसर अशा विविध उपक्रमांतून ही ग्रीन आर्मी पर्यावरण संवर्धनाचे कार्य करणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासूनच निसर्गाप्रती जबाबदारीची भावना निर्माण व्हावी, हा मुख्याध्यापक मुकेश नाईक यांच्या या संकल्पनेमागील मुख्य उद्देश आहे.
तुळशी विवाहाच्या पारंपरिक सोहळ्याला सामाजिक परिवर्तनाची जोड देत विद्यालयाने ‘हुंडा नको, बियांची ओंजळ द्या’ हा विचार समाजासमोर मांडला. या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमासाठी आर्थिक सहकार्य जाहीर केल्याबद्दल संस्थेचे संस्थाध्यक्ष प्रशांत भाऊ नाईक यांनी युवा उद्योजक अल्पेश भाऊ देवरे यांचे आभार मानले.





















