जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२६
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळच असलेल्या आडगाव येथे शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर घेऊन जाताना चालकाचा अचानक ताबा सुटल्याने ट्रॅक्टर थेट जामदा डाव्या कालव्यात कोसळून झालेल्या भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास आडगाव परिसरात घडली.

एरंडोल तालुक्यातील आडगाव येथील विजय भाऊसाहेब पाटील (वय १९) असे मृत तरुणाचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण आडगाव परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, आडगाव येथील भाऊसाहेब बापुराव पाटील यांच्या मालकीचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्टर त्यांचा मोठा मुलगा विजय चालवत होता. गुरुवारी सकाळी भूषण चौधरी यांच्या शेतात रोटाव्हेटरच्या साहाय्याने मशागतीचे काम करण्यासाठी विजय ट्रॅक्टर घेऊन निघाला. तर, पारोळा फाट्याजवळील जामदा डाव्या कालव्याच्या पाटचारीवरून जात असताना अचानक ट्रॅक्टरवरील त्याचा ताबा सुटला. त्यामुळे ट्रॅक्टर थेट कालव्यात जाऊन कोसळले. या भीषण अपघातात विजय ट्रॅक्टरखाली दबला गेल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघाताची माहिती मिळताच ईश्वर दयाराम पाटील यांनी विजयचे काका धनराज डिंगबर पाटील यांना ही माहिती दिली. धनराज पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या वेळी पोलीस पाटील तसेच नागरिकांच्या मदतीने ट्रॅक्टरखाली अडकलेल्या विजयला बाहेर काढण्यात आले.
अपघातानंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली होती. तर, गंभीर जखमी विजयला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले. तर, विजयचा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयत विजयचे काका धनराज डिंगबर पाटील यांनी कासोदा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीवरुन घटनेची नोंद करण्यात आली आहे.
विजय हा भाऊसाहेब पाटील यांचा मोठा मुलगा होता. त्यांच्या पश्चात आई, वडील आणि लहान भाऊ असा परिवार आहे. घरातील मोठा मुलगा आणि कुटुंबाचा आधार असलेल्या विजयच्या अकाली निधनाने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे आडगाव परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.




















