जळगाव मिरर | २१ नोव्हेंबर २०२६
बोदवड तालुक्यातील नाडगाव ते हिंगणा फाट्यादरम्यान पडलेल्या मोठ्या खड्यामुळे नारळ वाहणारा ट्रक उलटला. या अपघातातून सुर्दैवाने चालक बचावला आहे. तर वर्षभरापासून पडलेल्या या खड्याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

म्हैसूर येथून दिल्लीच्या दिशेने नारळ घेऊन जाणारा ट्रक २० नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजता नाडगाव ते हिंगणा फाटादरम्यान पडलेल्या मोठ्या खड्ड्यामुळे अपघातग्रस्त झाला. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रकाशामुळे चालकाला खड्ड्याचा अंदाज न आल्याने ट्रक खड्ड्यातून उदळला. या वेळी ट्रकचा पाटा तुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. सुदैवाने या अपघातात चालक सुखरूप बचावला. ट्रक उलटल्यामुळे रस्त्यावर पडलेल्या नारळांमुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तर, अपघातानंतर रस्त्यावर पडलेले नारळ गोळा करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर ते इंदूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एनएच ७५३ एल वरील नाडगाव ते हिंगणा फाटादरम्यान पडलेला मोठा खड्डा वाहनचालकांसाठी जीवघेणा ठरत आहे. गेल्या वर्षभरापासून या खड्ड्याची समस्या कायम असून, संबंधित प्रशासनाकडून दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
या खड्ड्यामुळे आतापर्यंत सुमारे १८ ते २० अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातांमध्ये ५ चारचाकी वाहने, १० दुचाकी आणि ३ ट्रकचा समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे. वारंवार अपघात घडूनही रस्त्यावरील हा खड्डा बुजवण्यासाठी ठोस उपाययोजना न झाल्याने प्रवासी व वाहनचालकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. छत्रपती संभाजीनगर ते इंदूर हा महत्त्वाचा राष्ट्रीय महामार्ग असून, संबंधित रस्त्याचा हा भाग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यक्षेत्रात असल्याचे सांगण्यात येते. या मार्गावर वारंवार अपघात होत असतानाही संबंधित विभागाकडून खड्डा दुरुस्ती व सुरक्षिततेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. तर, संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवावा, धोकादायक ठिकाणी सूचना फलक व रात्री स्पष्ट दिसणारी सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी वाहनचालक व परिसरातील नागरिकांकडून होत आहे.





















