
जळगाव मिरर | २६ मे २०२६
वाढते तापमान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या उद्देशाने, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक ९ मध्ये एक महत्त्वपूर्ण ‘ग्रीन कॉरिडोर’ प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. कचरा फॅक्टरी ते चंदू अण्णा चौक आणि निमखेडी गाव ते सुरत रेल्वे गेट अशा सुमारे ४ किलोमीटरच्या पट्ट्यात हा उपक्रम राबवला जाणार आहे. या प्रकल्पाचे नियोजन करण्यासाठी आज महानगरपालिकेच्या पर्यावरण विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन समितीच्या वतीने संयुक्त पाहणी दौरा करण्यात आला.
शास्त्रीय सर्वेक्षणातून भीषण वास्तवाचे दर्शन या पाहणी दरम्यान, पर्यावरण विभागाचे अधिकारी प्रकाश पाटील, पर्यावरण रक्षक वसंत पाटील आणि अखिल भारतीय आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या पथकाने संपूर्ण ४ किलोमीटरच्या मार्गाचे तांत्रिक मोजमाप केले. सोबतच, मातीची सुपीकता आणि वृक्षारोपणासाठी उपयुक्त अशा विविध घटकांचे सखोल परीक्षण करण्यात आले.
यावेळी घेण्यात आलेल्या तापमान नोंदीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. उघड्या रस्त्यावर तापमानाचा पारा तब्बल ५२ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता, तर त्याच परिसरातील नैसर्गिक छायेखाली (झाडांखाली) तापमान केवळ ३८ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. रस्त्यावरील आणि झाडांखालील तापमानातील हे १४ अंशांचे अंतर, शहरात हरित पट्ट्याची किती आवश्यकता आहे, हे अधोरेखित करते.
‘ग्रीन कॉरिडोर’साठी वृक्ष निवडीवर भर
या सर्वेक्षणाअंती, ग्रीन कॉरिडोरमध्ये कोणत्या प्रजातीची झाडे लावल्यास ती स्थानिक हवामानात वेगाने वाढतील आणि जास्तीत जास्त सावली व ऑक्सिजन देतील, यावर तज्ज्ञांनी सविस्तर चर्चा केली. केवळ वृक्षारोपणच नव्हे, तर या झाडांचे संवर्धन कसे करता येईल, याचा आराखडाही यावेळी तयार करण्यात आला. हा प्रकल्प जळगाव शहरासाठी ‘पर्यावरणीय सुरक्षा कवच’ ठरणार असून, भविष्यात नागरिकांना वाढत्या उष्म्यापासून मोठा दिलासा मिळणार आहे. महापालिकेच्या या पुढाकाराचे पर्यावरणप्रेमींनी स्वागत केले आहे.






















