जळगाव मिरर | १४ ऑगस्ट २०२४
जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच चाळीसगावकडून नांदगावकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनरने आजोबासोबत रस्ता ओलांडणाऱ्या ४ वर्षीय चिमुकल्याला चिरडल्याची घटना घडली. तळेगाव येथील बसस्थानकानजीक मंगळवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास घडलेल्या या अपघातात चिमुकला जागीच ठार झाला. जीवन सचिन गोरे असे त्याचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, जीवन हा मोरे कुटुंबाचा एकुलता मुलगा असल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी कंटनेर चालकाला चोप देत कंटेनरला आग लावली. तसेच रस्त्यावर ठिय्या दिला. जोपर्यंत या रस्त्यावर गतिरोधक बसवला जात नाही, तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही, असा पवित्रा घेतला.
घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा दाखल झाला होता. सायंकाळपर्यंत ग्रामस्थ महामार्गावर ठाण मांडून होते. जीवन हा आजोबांसमवेत घराकडे जाण्यासाठी रस्ता ओलांडत असताना चाळीसगावकडून नांदगावकडे वेगाने जाणाऱ्या कंटेनरने (के ए ४४/ ए १९७५) बालकास जोरदार धडक दिली. बालक कंटेनरखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. आग लावलेल्या कंटेनरला विझवण्यासाठी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले होते. घटनेची माहिती मिळताच चाळीसगाव ग्रामीणा पोलिस व शहर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र जमाव ऐकण्याच्या स्थितीत नव्हता.