अमळनेर : विक्की उत्तम जाधव
अमळनेर येथे एप्रिल महिन्यात तरुणाचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने दहिवद येथील एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात अशोक प्रकाश पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील दहिवद खुर्द येथील प्रवीण पांडुरंग पाटील याला २२ एप्रिल २०२३ रोजी रात्री नऊ वाजता त्याचा मित्र अशोक ऊर्फ रिंकू प्रकाश पाटील ( वय २८) याने दुचाकीवर बसवून बाहेर नेले होते. दि. २३ एप्रिल रोजी सकाळी प्रवीण याचा मृतदेह लोणे भोणे फाट्याजवळ लेंडी नाल्यात आढळून आले होते. त्यांच्या अंगावर जखमा आढळून आल्या होत्या. घटनास्थळी पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी भेट दिली होती.
त्याचा संशयास्पद मृत्यू झाल्याचा आरोप प्रवीणची आई व नातेवाइकांनी केला आणि आरोपीला अटक करण्याची मागणी केली होती. प्रवीण घरी न आल्याने आई इंदूबाई पांडुरंग पाटील हिने गणेश श्रीराम पाटील यांच्या फोनवरून मुलाबाबत अशोककडे चौकशी केली असता त्याने फोन बंद करून घेतला होता. त्यामुळे आईचा संशय बळावला होता. प्रवीण पुलावरून खाली नाल्यात पडल्याने त्याचा मृत्यू झाला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता. प्रवीणची आजी इंदूबाई व नातेवाईकानी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतली होती. त्यांनी रिंकूवर संशय व्यक्त केला होता. अखेर इंदूबाई यांनी न्यायालयात धाव घेतली.