जळगाव मिरर | राजकीय विशेष
राज्यात गेल्या तीन दिवसात महायुती व महाविकास आघाडीसह तिसऱ्या आघाडीचे उमेदवार आता जाहीर झाले आहे. यात रावेर मतदार संघासाठी यंदा चार दिग्गज नेते विधानसभेच्या मैदानात उतरविण्यात आल्याने यंदाची विधानसभा निवडणुकीचे मैदान कोण मारत यावर आता जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
रावेर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक वर्षापासून कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून हा मतदार संघ प्रसिद्ध असून यात भाजपने देखील बाजी मारली आहे. त्यानंतर पुन्हा आ.शिरीष चौधरी यांनी या मतदार संघात कॉंग्रेसला जिवंत केले होते. त्यानंतर यंदाच्या निवडणुकीत आ.शिरीष चौधरी यांचे पुत्र धनंजयभाऊ चौधरी यांना कॉंग्रेसतर्फे उमेदवारी जाहीर झाली आहे तर दुसरीकडे महायुतीतील भाजपतर्फे जिल्हाध्यक्ष अमोल हरीभाऊ जावळे यांना पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर केली आहे. अमोल जावळे हे भाजपचे माजी खा.स्व.हरीभाऊ जावळे यांचे चिरंजीव असून ते देखील गेल्या अनेक वर्षापासून मतदार संघात जनसंपर्क वाढविला आहे. तर तिसरी आघाडीतील आ.बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्तीतर्फे भुसावळचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांना उमेदवारी फायनल झाली आहे.
अनिल चौधरी देखील गेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या मैदानात होते, त्यावेळी त्यांचा पराभव आ.शिरीष चौधरी यांनी केला होता. सोबतच वंचित बहुजन आघाडीतर्फे शमिभा पाटील यांना देखील पहिल्याच यादी स्थान मिळाले असून त्यांनी देखील जोरदार तयारी सुरू आहे. या चार मातब्बर नेत्यांच्या विरोधात आणखी काही अपक्ष उमेदवारी अर्ज करू शकतात. त्यामुळे यंदा रावेर विधानसभा मतदार संघात चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र दिसत आहे. तर रावेर विधानसभा मतदार संघाचे मैदान कोण मारतेय याकडे जळगाव जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
