जळगाव मिरर | १४ सप्टेंबर २०२४
राज्यात आगामी विधानसभा निवडणूक अजून घोषित झालेली नसली तरी राज्यातील राजकीय वातवरण तापले आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप होत असतांना नुकतेच जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. आ.एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा भाजपच्या नेत्यांवर निशाणा साधला असून यावेळी त्यांनी भाजपच्या एका नेत्याची आपल्याकडे मुलीशी चाळे करतानाची व्हिडिओ क्लिप होती असा दावा केला आहे. ही क्लिप अनेक दिवस माझ्याकडे होती, पण एकेदिवशी ती अचानक मोबाइलमधून डिलीट झाली, असे ते म्हणालेत. हा दावा करताना खडसेंनी कोणत्याही नेत्याचे नाव घेतले नाही. पण त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय गोटात एकच खळबळ माजली आहे.
आ.एकनाथ खडसे यांनी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना वरील खळबळजनक दावा केला. ते म्हणाले, माझ्याकडे भाजपचा एक नेता मुलीशी चाळे करतानाचा एक व्हिडिओ होता. हा व्हिडिओ मी भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठांनाही दाखवला. तो व्हिडिओ कुणाचा होता हे मी सांगणार नाही. पण तुम्हाला जी नावे माहिती आहे, त्यापैकीच हा एक होता. मी मुक्ताईची शपथ घेऊन सांगतो, माझ्याकडे भाजपचा नेता मुलीसोबत चाळे करतानाचा व्हिडिओ होता. जवळपास 15 ते 20 दिवस तो व्हिडिओ माझ्याकडे होता. मी तो काही पत्रकारांनाही दाखवला. पण नंतर तो अचानक माझ्या मोबाइलमधून डिलीट झाला. तो डिलीट कसा झाला हे मलाही समजले नाही. कारण, मला मोबाइल फार समजत नाही.