
जळगाव मिरर | ९ मे २०२६
जामनेर तालुक्यातील नाचणखेडे येथील शेतकरी बळीराम गोबा चौधरी (९४) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. विशेष म्हणजे, अवघ्या आठ दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. आयुष्यभराच्या सोबतीचा आधार तुटल्याने, पत्नीच्या पाठोपाठ पतीनेही जगाचा निरोप घेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बळीराम चौधरी यांच्या पत्नी वत्सलाबाई चौधरी यांचे याच आठवड्यात हृदयविकाराने निधन झाले होते. संसाराच्या प्रवासात सावलीसारखी सोबत करणाऱ्या पत्नीच्या निधनाचे दुःख बळीराम चौधरी यांना सहन झाले नाही. पत्नीच्या निधनानंतर ते खचले होते. आठवडा उलटत नाही तोच शुक्रवारी त्यांचीही प्राणज्योत मालवली. या घटनेने ‘दोघांची कायमची’ असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती.
चौधरी दाम्पत्य गावात त्यांच्या धार्मिक आणि कष्टाळू स्वभावासाठी परिचित होते. त्यांच्या पश्चात नाचणखेडे येथील माजी सरपंच राजेंद्र चौधरी आणि जळगावच्या शाहू महाराज रुग्णालय तंत्रज्ञ संजय चौधरी यांचे ते वडील होत. बळीराम चौधरी यांची अंत्ययात्रा शनिवारी (दि. ९) सकाळी ९ वाजता नाचणखेडे येथील त्यांच्या राहत्या घरापासून निघणार आहे. एकाच आठवड्यात आई-वडिलांचे छत्र हरपल्याने चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.





















