जळगाव मिरर | १ डिसेंबर २०२४
सैन्य दलात औषध साठ्याची आवश्यकता असल्याचे सांगून एका अनोळखी व्यक्तीने सुनील भिवसन चौधरी (वय ५५, रा. सुदर्शन भवन, चाळीसगाव) यांना ६ लाख ७ हजार ७०० रुपयात ऑनलाईन गंडविले. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली, याप्रकरणी शनिवारी सायबर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील सुनिल भिवसन चौधरी हे वास्तव्यास असून त्यांचे मेडीकल आहे. त्यांना दि. २३ नोव्हेंबर रोजी दुपारी चार वाजता एका अनोळखी व्यक्तीने मोबाईवरुन संपर्क साधला. मी चाळीसगाव ग्रेस अकॅडमी मिलटरी डिपार्टमेंटमधून बोलत असल्याचे सांगून आमच्या डिपार्टमेंटला औषधांची आवश्यकता आहे, त्यासाठीची यादी व्हाटसअॅपवर पाठवतो, त्यानुसार तुम्ही औषधी पाठवा असे सांगितले. यादी मिळाल्यावर समोरील व्यक्तीने तम्ही फोन पे वरुन दहा रुपये पाठविण्यास सांगितले. सुनिल चौधरी यांनी दहा रुपये पाठविल्यावर ठगाने त्यांना २० रुपये पाठविले.
सुनिल चौधरी यांचा मुलगा जयदीप याला चौधरींच्या मोबाईलच्या फोन पे अॅपमधील इंटर क्रेडीट कार्ड डिटेल्स, बँकेचे नाव व १ लाख ३९ हजार ५८० रुपयांचा तपशील पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ठगाने चौधरी यांच्या बँक खात्यातून ६ लाख ७ हजार ७०० ऑनलाईन काढून घेतले. ऑनलाईन ठगांनी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर चौधरी यांनी प्रथम चाळीसगाव पोलीस ठाणे नंतर जळगावला सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार शनिवारी गुन्हा दाखल झाला. तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.