जळगाव मिरर | २० ऑगस्ट २०२४
संतांचे आशीर्वाद प्रेरणा देतात. सेवेतून सत्कार्य घडते. संतांचे कीर्तनातून प्रबोधन हे प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्येत होत आहे हे पुण्याचे काम आहे. प्रत्येकाने किर्तन श्रवण करून सात्विक होण्याचे भाग्य घ्यावे असे आवाहन जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी केले.
उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीरामचंद्र यांचे जन्मस्थान अयोध्या येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अयोध्या येथे भगवान प्रभू श्रीरामचंद्र मूर्ती प्राणप्रतिष्ठा निमित्ताने अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवामध्ये बेळी येथील श्रीक्षेत्र कुंडलेश्वर येथील हभप भरतजी महाराज पाटील हे भाविकांना मोलाचे मार्गदर्शन करीत आहेत. या ठिकाणी सोमवार दि. १९ ऑगस्ट रोजी शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी सदिच्छा भेट देऊन संत महाराजांचे आशीर्वाद घेतले.
यावेळी राजू मामा भोळे यांनी अयोध्या मध्ये प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेतले. तसेच दिव्य श्रीराम कथा महोत्सवाच्या ठिकाणी भेट दिली. यावेळी आमदार भोळे यांच्या हस्ते महाआरती झाली. त्यावेळी बोलताना आ. राजूमामा भोळे म्हणाले की, कीर्तन व कथा महोत्सवातून भारतीय संस्कृतीचा अभिमानास्पद वारसा पुढे जात आहे.
अयोध्या मध्ये कीर्तन सप्ताहामुळे आपल्याला मोठे पुण्य लाभत आहे. हभप भरतजी महाराज यांचे प्रवचन मोलाचे आहे. महाराजांच्या वाणीतून साक्षात परमेश्वराचे आशीर्वाद आपल्याला लाभत आहे असेही आ. भोळे म्हणाले. किर्तन सोहळा व कथा महोत्सवाला महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातून भाविक उपस्थित झालेले आहेत. आयोजन सद्गुरु झेंडूजी महाराज बेळीकर दिंडी परंपरा फड पुरस्कृत आहे.